PCMC Election 2026 : पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
By नारायण बडगुजर | Updated: January 1, 2026 18:31 IST2026-01-01T18:29:51+5:302026-01-01T18:31:26+5:30
- विरोधकांकडून आमदार अण्णा बनसाेडे यांच्या मुलावर आरोप

PCMC Election 2026 : पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पिंपरीचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी दिली आहे. त्यावरून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत नेहरुनगर-मासूळकर काॅलनी-खराळवाडी-गांधीनगर या प्रभाग क्रमांक ९ - अ (अनुसूचित जाती) या जागेसाठी तब्बल २७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यात भाजप, शिंदेसेना (शिवसेना - एकनाथ शिंदे), उद्धवसेना (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यासह इतर काही पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी या निवडणुकीत इतर प्रभागांमध्ये एकत्र लढत असून, प्रभाग नऊमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. असे असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे हे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी प्रभाग नऊमधून सिद्धार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरून प्रभागातील स्थानिक उमदेवारांकडून आरोप करण्यात येत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे आरोप करताना म्हणाले, सिद्धार्थ बनसोडे हे बाहेरच्या प्रभागातील आहेत. ते आमच्या प्रभागातून निवडणूक लढवत असल्यामुळे आमच्यासारख्या स्थानिक उमेदवारांवर एकप्रकारे अन्यायच आहे. त्यांचे वडील अण्णा बनसोडे हे आमदार असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ही उमेदवारी मिळवली आहे. इतक्या कमी वयात सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर हाफ मर्डरसारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रभागाचे भविष्य काय असेल, असा प्रश्न पडत असून, हा आमच्यासाठी चिंतेचा आहे.
सिद्धार्थ बनसोडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वींचे दाखल गुन्ह्यांचे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. विरोधकांनी आताच्या मुद्यांवर बोलावे. मी सर्वसामान्य तरुण म्हणून निवडणूक लढवत आहे. विरोधकांकडूनच मला आमदार पुत्र संबोधण्यात येत आहे. प्रभागातून मला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून असे आरोप करण्यात येत आहेत.
..हा आवाज दाबण्याचा प्रयत्न : बाबा कांबळे
प्रभाग ९ अ - या जागेसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज अवैध ठरलेले बाबा कांबळे यांनीही आरोप केले आहेत. प्रस्थापित राजकीय नेत्यांनी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज बाद करणे, हे एक पूर्वनियोजित राजकीय षडयंत्र आहे. ‘प्रस्थापितांच्या राजकीय षडयंत्रात कष्टकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून महिनाभर प्रचार केला. मात्र, स्थानिक भूमिपुत्राचा विचार न करता बाहेरील उमेदवार लादले गेले. गांधीनगर पुनर्वसन प्रकल्प आणि घरकुल योजनेसाठी नागरिकांच्या बाजूने उभे राहणे ही माझी चूक आहे का?, बाहेरील उमेदवाराला विरोध करणे हा माझा गुन्हा आहे का, असे प्रश्न उपस्थित करून बाबा कांबळे यांनी आरोप केले आहेत.