PCMC Elections2026 : भ्रष्टाचाराच्या आराेपांवरून भाजप नेत्यांना वरिष्ठांच्या कानपिचक्या
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 11, 2026 14:46 IST2026-01-11T14:45:31+5:302026-01-11T14:46:06+5:30
विरोधात अजित पवार एकटेच मैदानात : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची चुप्पी का?; भाजपचे स्थानिक नेते सावध पवित्र्यात; महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी रस्सीखेच

PCMC Elections2026 : भ्रष्टाचाराच्या आराेपांवरून भाजप नेत्यांना वरिष्ठांच्या कानपिचक्या
पिंपरी : मूर्ती खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढून २०१७ मध्ये राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्तेतून खाली खेचलेल्या भाजपवर आता राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे अस्त्र सोडले आहे. या मुद्द्यावर शहरातील भाजपचा एकही नेता समाेर येऊन बाेलत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपला नामोहरम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार एकटेच मैदानात उतरले आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार)च्या स्थानिक नेत्यांची यावर चुप्पी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करत प्रचारात रान पेटविले होते. पांडुरंगाच्या मूर्तीतही घोटाळा करून पैसे लाटले जात असल्याने मतदारांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कामकाजावर संताप व्यक्त करीत भाजपला पसंती दिली. भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिकेवर कब्जा मिळवत इतिहासात पहिल्यांदाच सत्ता मिळविली. कालांतराने मूर्ती घाेटाळ्याचा आरोप फुसका ठरला. त्यात कोणताही घोटाळा झाल्या नसल्याचे तत्कालीन महापालिका आयुक्तांनी चौकशीनंतर जाहीर केले.
यंदाच्या निवडणुकीत हातातून निसटलेली महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार)चे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार)साेबत हातमिळवणी केली आहे. २०१७ पासून २०२२ या सत्ताकाळात आणि नंतर प्रशासनकाळात भाजपने महापालिकेत केलेल्या काेट्यवधीच्या भ्रष्टाचाराचे अस्त्र अजित पवारांनी सोडले आहे. पवार प्रत्येक जाहीर सभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचारावर घणाघात करत आहेत. महापालिकेवरील कर्ज वाढल्याचे, ठेवी घटल्याचे सांगत भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढत आहेत. शहरात भाजपच्या स्थानिक नेत्यांची दादागिरी, दहशत वाढली असून, त्यांना सत्तेचा माज, मस्ती आल्याचा थेट आराेप ते करत आहेत.
भाजप बचावात्मक भूमिकेत
भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात आणि प्रशासकीय राजवटीत भाजप नेत्यांच्या कलानुसार कारभार सुरू हाेता. मागील नऊ वर्षांतच महापालिकेच्या ठेवी घटल्या आहेत. महापालिकेवर कर्जही झाले आहे, ही बाब जगजाहीर झाली असल्यामुळे पवार यांनी आक्रमक प्रचार सुरू केला आहे. त्याला कसे ताेंड द्यायचे हेच स्थानिक भाजपच्या नेत्यांना कळत नसल्याचे दिसून येत आहे. ते बचावात्मक भूमिकेत गेल्याचे सध्यातरी दिसत आहे.
आयारामांना संधी दिल्यामुळे अंतर्गत खदखद
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने घाऊक पद्धतीने इतर पक्षांतील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. ‘शत-प्रतिशत भाजप’चा आत्मविश्वास व्यक्त करत विरोधकांना प्रवेश दिला. भाजपची ताकद वाढली असली तरी, निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिल्याने अनेक प्रभागांत खदखद उफाळून येत आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र मूग गिळून गप्प
महापालिकेतील कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर, तसेच कर्जबाजारीपणावर अजित पवार बाेलत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचा एकही स्थानिक पदाधिकारी बोलत नाही. त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे. स्थानिक नेत्यांची याप्रकरणी चुप्पी का, असा प्रश्न विचारला जात आहे.
भाजपने स्थानिक नेत्यांची केली कानउघाडणी
भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. बंदद्वार बैठकीत जनमत पक्षाच्या विरोधात जात असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नेत्यांकडून झालेल्या चुकीच्या कामांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. ‘डॅमेज कंट्रोल’ कसे करायचे, नाराजी कशी दूर करायची, यावर चर्चा झाली. बैठकीनंतरही भाजपमध्ये खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.