Municipal Election : दुबार नावे, पत्ते आणि प्रभागही बदलले; महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 27, 2025 13:42 IST2025-11-27T13:40:52+5:302025-11-27T13:42:47+5:30
दिवाळीत ‘बीएलओं’चा कामचुकारपणा : वरिष्ठ अधिकारी बदलीच्या मूडमध्ये; आवश्यक वेळ, साधन-सुविधा आणि नियोजनातील सातत्याचा अभाव

Municipal Election : दुबार नावे, पत्ते आणि प्रभागही बदलले; महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर नमुना समोर आला आहे. लाखो मतदारांचे घर क्रमांक गायब, नावे चुकीची, मृत व्यक्तींची नावे कायम, पुनरावृत्ती अशा चुका असून यामागे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा (बीएलओ) कामचुकारपणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उदासीनता ही प्रमुख कारणे असल्याची चर्चा सुरू आहे.
मतदार पडताळणीची जबाबदारी असलेल्या बीएलओंना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काम देण्यात आले होते. सुट्टीच्या काळात घराघरांतील पडताळणीसाठी आवश्यक वेळ, साधन-सुविधा किंवा नियोजन न दिल्याने अनेकांनी हे काम केवळ कर्तव्यपूर्ती म्हणून केले. परिणामी प्रत्यक्ष पडताळणी न होता अनेक नावे तशीच पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती कर्मचाऱ्यांतून पुढे येत आहे.
वरिष्ठांकडून देखरेख कमी
मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत होत्या. त्यादरम्यान, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहायक आयुक्त अविनाश शिंदे हे तिघेही बदलीच्या प्रतीक्षेत होते. बदल्या कधीही होऊ शकतात, या मानसिकतेत वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित बैठका, पाठपुरावा आणि पडताळणीवरील देखरेख कमी झाली.
कर्मचाऱ्यांवर अंकुशच नसल्याचे चित्र
वरिष्ठांच्या उदासीनतेमुळे बीएलओ व स्थानिक कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिला नाही. पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली. या निष्काळजीपणाचा थेट परिणाम मतदार याद्यांमध्ये दिसून आला. शहरातील १७ लाख १३ हजार ८९१ मतदारांपैकी तब्बल ३ लाख ६३ हजार ९३९ मतदारांचे घर क्रमांकच नोंदलेले नाहीत, तर नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक मतदारांचे पत्ते गायब आहेत. अनेक प्रभागांमध्ये तर ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. हजारो मतदारांचे प्रभाग बदलण्यात आले आहेत.
मतदार राहणार वंचित
मतदारयाद्यांतील या गोंधळामुळे आगामी निवडणुकीत हजारो नागरिकांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी, बदललेल्या याद्या किंवा मत वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा प्रत्येक घर पडताळणी मोहीम राबविण्याची, बीएलओंना पुनःप्रशिक्षण देण्याची आणि हरकती नोंदविण्याकरिता मुदत वाढविण्याची मागणी होत आहे. निवडणूक तोंडावर असताना प्रशासनातील साखळीत झालेल्या या एकूण निष्काळजीपणामुळे मतदारयाद्यांचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग व महापालिकेवर तातडीने सुधारणा करण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
हरकतींसाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयाद्यांमधील धक्कादायक त्रुटींवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. हरकती आणि सूचनांसाठी गुरुवार (दि.२७) शेवटचा दिवस होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.२६) सुधारित आदेश काढत ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हरकतींवर निर्णय घेऊन १० डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदान केंद्रांची यादी १५ डिसेंबरला तर प्रभागनिहाय मतदार याद्या २२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
मोबाइल फ्रेंडली याद्या करा...
अनेक प्रभागांतील हजारो मतदारांची नावे चुकीने इतर प्रभागांत समाविष्ट झाली. प्रशासनाने अशा सर्व चुका स्वतःहून शोधून दुरुस्त कराव्यात. संबंधित प्रभागासाठी एकत्रित हरकती स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. दुबार नावे, बोगस नावे, अपूर्ण व चुकीची नावे, पत्ता या त्रुटी दूर कराव्यात. डिजिटल वाचनीय मतदारयाद्या, फोटोसह मतदारांची नावे, नागरिकांना आपले नाव शोधता यावे, यासाठी मोबाइल फ्रेंडली लिंक या सुविधा असाव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.
या आहेत प्रारूप मतदारयादीत त्रुटी...
- ३,६३,९३९ मतदारांचे घर क्रमांक गायब
- ९२ हजार ६६४ नावे दुबार
- नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक पत्ते नोंद नाहीत
- काही प्रभागांतील मतदार याद्यांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक त्रुटी
- घर नसताना अपार्टमेंटचे नमुने, चुकीची नावे, मृत व्यक्तींची नावे यादीत कायम