PCMC Election Results 2026 : महापालिकेचा निकाल लागला तरी महापौरपदाचे आरक्षण गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:14 IST2026-01-17T16:14:12+5:302026-01-17T16:14:55+5:30
- अनुसूचित जाती (एससी)चे आरक्षण अद्याप बाकी

PCMC Election Results 2026 : महापालिकेचा निकाल लागला तरी महापौरपदाचे आरक्षण गुलदस्त्यातच
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला, तरी महापौरपदाचे आरक्षण अद्याप घोषित न झाल्याने उत्सुकता वाढली आहे. शहरातील लोकसंख्या, तसेच महापौर आरक्षण लागू झाल्यापासूनचा सविस्तर तपशील पिंपरी-चिंचवड महापालिकेने सप्टेंबरमध्ये राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अद्यापही महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार आहे. मात्र, महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, हे अस्पष्ट आहे.
आतापर्यंत महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), तसेच अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गांतील नगरसेवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता केवळ अनुसूचित जाती (एससी) हा प्रवर्ग शिल्लक राहिल्याने, यावेळी महापौरपद ‘एससी’साठी आरक्षित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
यांची लागू शकते वर्णी...
महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यास भाजपमधून अनुराधा गोरखे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आशा सूर्यवंशी, ॲड.विनायक गायकवाड, कुंदन गायकवाड, डॉ.सुहास कांबळे, रिपाइंचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, तर शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मनिषा पवार यापैकी एकाची वर्णी लागू शकते.