PCMC Election 2026: उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं? निवडणुकीत सग्यासोयऱ्यांचे राजकारण
By विश्वास मोरे | Updated: January 4, 2026 18:08 IST2026-01-04T18:08:12+5:302026-01-04T18:08:37+5:30
- खासदार, आजी-माजी आमदार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, माजी पदाधिकाऱ्यांच्या घरातच वाटली तिकिटे; सर्वच पक्षांतील चित्र

PCMC Election 2026: उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं? निवडणुकीत सग्यासोयऱ्यांचे राजकारण
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र सर्वच पक्षांनी खासदार, आमदार, महापौर, माजी पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. ‘उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं?’ असा सवाल कार्यकर्तेच करत आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर स्थानिक नेत्यांचे वर्चस्व आहे. महापालिका निवडणुकीत नेत्यांच्या नातलगांनाच उमेदवारी मिळत असल्याचा इतिहास आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे, काँग्रेस अशा सर्व पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, खासदार, आमदार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेता, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या मुलांना, पत्नी, नातलगांचा त्यात भरणा आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का, असा सवाल कार्यकर्ते करत आहेत.
आमदार आणि महापौरपुत्रांना संधी
प्रभाग १ : मागीलवेळी सुरेश म्हेत्रे यांच्या सूनबाई स्विनल म्हेत्रे, तर आता स्वत:. दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा मुलगा यश साने.
प्रभाग २ : माजी नगरसेवक बबन बोराटे यांचे पुतणे वसंत, माजी महापौर शरद बोऱ्हाडे यांचे पुतणे निखिल.
प्रभाग ४ : माजी नगरसेवक रामचंद्र गायकवाड यांचे पुत्र उदय गायकवाड.
प्रभाग ७ : माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पुत्र नितीन लांडगे.
प्रभाग ८ : माजी नगरसेवक संजय वाबळे यांची पत्नी अश्विनी वाबळे.
प्रभाग ९ : आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांचे बंधू सद्गुरू कदम, माजी महापौर हनुमंतराव भोसले यांचे पुत्र राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर यांची पत्नी शीतल मासुळकर.
प्रभाग १० : माजी महापौर मंगला कदम व माजी महापौर अशोक कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम. आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे.
प्रभाग १२ : माजी शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर यांच्या पत्नी सीमा भालेकर.
प्रभाग १३ : माजी नगरसेविका कमल घोलप यांचे पती अनिल घोलप.
प्रभाग १६ : नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि पत्नी जयश्री भोंडवे.
प्रभाग १७ : दिवंगत विरोधी पक्षेनेते तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा वाल्हेकर. माजी सत्तारूढ पक्षनेते श्याम वाल्हेकर यांचे भाचे सचिन चिंचवडे.
प्रभाग १८ : माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र सागर चिंचवडे.
प्रभाग २० : माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे यांच्या पत्नी मनीषा लांडे.
प्रभाग २१ : माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे.
प्रभाग २४ : खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे नीलेश बारणे. माजी उपमहापौर झामा बारणे यांचे पुत्र सिद्धेश्वर, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे, तर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सचिन भोसले यांची पत्नी वर्षा भोसले.
प्रभाग २५ : दिवंगत माजी नगरसेवक तानाजी कलाटे यांचे पुत्र राहुल कलाटे, पुतणे मयूर कलाटे.
प्रभाग २८ : राष्ट्रवादीचे नेते नाना काटे आणि पत्नी शीतल काटे.
प्रभाग ३२ : दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे पुत्र अतुल शितोळे.