लोणावळ्यात उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:04 IST2025-12-31T15:04:36+5:302025-12-31T15:04:47+5:30
- राष्ट्रवादीच्या १६ पैकी ११ नगरसेविका असल्याने महिलांचा दावा : इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत राजकीय हालचाली वाढल्या

लोणावळ्यात उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?
लोणावळा : लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने यश एकहाती सत्ता मिळवली. नगराध्यक्षासह पक्षाचे १६ नगरसेवक घड्याळ चिन्हावर विजयी झाले आहेत. स्पष्ट बहुमतामुळे उपनगराध्यक्षपदही राष्ट्रवादी (अजित पवार)कडे जाणार, हे निश्चित असले तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
नगरपालिोत राष्ट्रवादीचे (अजित पवार) १६, भाजपचे चार, काँग्रेसचे तीन, अपक्ष तीन आणि उद्धवसेनेचा एक नगरसेवक आहे. राष्ट्रवादीच्या १६ पैकी ११ महिला नगरसेविका आहेत. नगराध्यक्षपद पुरुष उमेदवाराकडे गेल्याने उपनगराध्यक्ष पदावर महिला उमेदवाराची वर्णी लागावी, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार) १५ नगरसेवक प्रथमच नगरपालिकेत निवडून आले असून, त्यांना प्रशासकीय अनुभव मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक जीवन गायकवाड यांचे नाव अनुभवाच्या निकषावर चर्चेत आहे. आमदार सुनील शेळके यांचे निकटवर्तीय धनंजय काळोखे यांचे नावही आघाडीवर आहे.
महिला दावेदारांबाबत राजकीय गणिते महत्त्वाची
महिला दावेदारांबाबत राजकीय गणिते महत्त्वाची ठरत आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधील लक्ष्मी पाळेकर यांचे पती नारायण पाळेकर यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविले आहे, तर प्रभाग क्रमांक ७ मधून माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचा पराभव करत आरती तिकोणे निवडून आल्या असून, त्यांचे पती मारुती तिकोणे यांनीही पूर्वी उपनगराध्यक्षपद सांभाळले आहे. त्यामुळे पाळेकर किंवा तिकोणे यापैकी एकीची उपनगराध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय समतोल साधणार का?
राष्ट्रवादीची (अजित पवार) स्पष्ट सत्ता असतानाही भाजपच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. भाजपचे देविदास कडू नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते; मात्र अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. प्रभाग क्रमांक ७ मधून ते बिनविरोध निवडून आले असून, आमदार शेळके यांना विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने (अजित पवार) त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. ते आमदार शेळके यांचे समर्थक मानले जातात. भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादीशी (अजित पवार) निवडणुकीत समन्वय साधल्याचे बोलले जाते. त्यामुळे राजकीय समतोल साधण्यासाठी किंवा युतीतील अंतर्गत समन्वय राखण्यासाठी कडू यांना उपनगराध्यक्षपद दिले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.