पिंपरी महापालिकेच्या तीन प्रभागात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 09:21 PM2021-07-06T21:21:40+5:302021-07-06T21:22:29+5:30

इंदौर येथील 'बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स' या संस्थेस कचरा विलगीकरणाच्या कामकाजासाठी प्रायोगिक तत्वावर नेमण्यात येणार...

Indore pattern of cleanliness will be implemented in three wards of Pimpri Municipal Corporation | पिंपरी महापालिकेच्या तीन प्रभागात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार 

पिंपरी महापालिकेच्या तीन प्रभागात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार 

googlenewsNext

पिंपरी :  स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदौर शहर हे मागील ४ वर्षापासून प्रथम क्रमांकाचे शहर ठरले असून पिंपरी चिंचवड शहराचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तीन वॉर्डात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार आहे, अशी माहिती महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.  

इंदौर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांची बैठक झाली. आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. याविषयी माहिती देण्यासाठी महापालिकेत पत्रकार परिषद झाली. यावेळी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, स्थायी समिती सभासद शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे उपस्थित होते.

नामदेव ढाके म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत इंदौर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस कचरा विलगीकरणाचे कामकाजासाठी प्रायोगिक तत्वावर ३  ते ५ वॉर्डमध्ये कामकाज करण्याकरिता नेमण्यात येणार आहे. इंदौर शहरातील स्वच्छता कशा प्रकारे ठेवण्यात येते व शहरामध्ये असलेल्या स्वच्छतेचे कारणाबाबत माहिती घेतली.  कचरा विलगीकरण हे ३ ऐवजी ६ प्रकारे ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैव वैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक यानुसार वर्गीकरण करण्यात येते. तसेच प्रत्येक घरामधून वरीलप्रमाणे ६ प्रकारामध्ये विलगीकरण असल्याशिवाय कचरा स्विकारण्यात येत नाही. कचरा संकलनासाठी नियुक्त असलेल्या वाहनांचे मार्ग व वेळ कधीही बदलण्यात येत नाही.

या कामकाजाकरिता प्रत्येक आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी, आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकडे वॉकी-टॉकीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. छोट्या वाहनांद्वारे संकलित केलेला कचरा हा कचरा स्थानांतरण केंद्रामध्ये आणण्यात येतो. त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या स्टेशनरी कॉम्पॅक्टरमध्ये विलगीकृत आणलेला कचरा टाकण्यात येतो. अनेक छोट्या वाहनांमधील कचरा हा कॉम्पॅक्ट स्वरुपात स्टेशनरी कॉम्पॅक्टरद्वारे हुक लोडरमध्ये टाकला जातो. त्याद्वारे कचरा डेपोपर्यंत त्याचे वहन केले जाते. इंदौर शहरामध्ये असलेले कचरा स्थानांतरण केंद्र हे प्रशस्त जागेमध्ये कार्यान्वित असून रहिवाशी सोसायट्यालगत ते स्थापित केले आहे. 

नितीन लांडगे म्हणाले, ‘‘इंदौर शहरामध्ये कचराकुंड्यांमध्ये छोट्या वाहनांमार्फत कचरा टाकण्याची आवश्यकता भासत नाही, तसेच सर्व निवासी, व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरा विलगीकरण होत असल्याने व कचरा संकलनाचे वाहन वेळेत कचरा संकलन करत असल्याने कचराकुंडीची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे संपूर्ण शहर कचराकुंडी विरहित आहे. मंडईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता बायोमिथिनेशन प्लेट कार्यान्वित केली आहे.  त्याठिकाणी मंडईमधील सर्व कचरा टाकण्यात येतो. त्यावर प्रक्रिया करुन सीएनजी गॅस तयार केला जातो. कचरा संकलनाची वाहनांचे व्हीटीएस यंत्रणेद्वारे मॅपिंग व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे कोणत्याही घराचा कचरा उलण्यापासून राहत नाही.

इंदौर शहरामध्ये झाडलोट कामकाज हे तीन शिफ्टमध्ये करण्यात येते. निवासी परिसरात २ वेळा व व्यापारी परिसरात ३ वेळा झाडलोट होते. तसेच स्वच्छतेच्या कामकाजाकरिता महानगरपालिकेकडे ९००० कर्मचारी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करण्यात येत असून केवळ रात्रपाळीमध्येच मुख्य रस्त्यांची सफाई केली जाते.  कचरा विलगीकरणासंबंधी त्यांचेद्वारे जनजागृती करण्यात येते.’’

Web Title: Indore pattern of cleanliness will be implemented in three wards of Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.