Rajesh Tope: ...त्या दिवशी राज्यात तातडीने लॉकडाऊन लागेल; राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:47 PM2021-08-11T20:47:58+5:302021-08-11T21:14:50+5:30

Rajesh Tope: कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात आता निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणाता शिथिलता देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यानुसार हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 15 ऑगस्टनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.

राज्यात आता निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा महत्वापूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवागनी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती, त्याच्या दीडपटीने व्यवस्था करा, अशी सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे.

टास्क फोर्सच्या सूचनेनूसार, जवळपास 3800 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत एका दिवसाला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन ज्यादिवशी लागेल, तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, खुल्या प्रांगणात लग्न सोहळ्याला 200 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर हॉलमध्ये क्षमतेच्या 50 टक्के तसेच जास्तीतजास्त 100 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले हवेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

Read in English