शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 11:22 AM2021-09-09T11:22:25+5:302021-09-09T11:32:01+5:30

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.

याशिवाय महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षही शमताना दिसत नाही. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक पार पडली.

यामध्ये राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती.

शरद पवार यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत केंद्रीय संस्थांकडून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्यासोबत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठकीत आमदारांकडून शिवसेने नेत्यांकडून कामे होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आमदारांची ही नाराजी शरद पवार मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही म्हटले जात आहे.

मंदिरे खुली करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी भाजपला कानपिचक्या देत टीकास्त्र सोडले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये आणि कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपयांबाबतही या बैठकीत विचार विनियम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या बैठकीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.