Kolhapur Flood : NDRF जवानांमुळे वाचले बाळाचे प्राण, करतायंत चोवीस-24 तास काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:56 PM2021-07-24T18:56:00+5:302021-07-24T19:15:56+5:30

एनडीआरएफ जवानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, या जवानाने हातात लहान जन्मलेलं मूल घेतलं आहे, अतिशय भावूक आणि मृत्यूच्या तांडवातही जगण्यास बळ देणारा हा क्षण वाटतो.

रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला.

मुख्यमंत्र्यांनी अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले. विशेष म्हणजे म्हाडाने या बेघरांना घर बांधून देण्याची घोषणाही केली आहे.

अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात आणि तातडीने येत नाहीत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता.

त्यावर, उत्तर देताना हे आरोप योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, रस्ते खचलेत, पूर येतोय तेथे घटनास्थळी पोहोचायला त्यांनाही वेळ लागत आहे.

पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी वस्तूस्थिती स्पष्टच सांगत, एनडीआरएफ जवानांच्या कार्याचं एकप्रकारे कौतुकच केलंय.

एनडीआरएफचे जवान घटनास्थळी उतरताच पाण्यात, वनात नागरिकांच्या मदतीसाठी कामाला जुडतात. खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडीत दरडीखाली गाडलेले १७ मृतदेह हाती आले आहेत. एनडीआरएफचे जवान जवळजवळ २४ तास दरड उपसत होते.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दरड कोसळली आणि शुक्रवारी सकाळपासून माती उपसा सुरू झाला. एनडीआरएफचे जवान आल्यानंतर कामाला वेग आला.

कोल्हापूरातील पूरग्रस्त भागातील ६०० हून अधिक जणांचं एनडीआरएफ जवानांकडून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. विशेष म्हणजे कोल्हापूर पुरात एनडीआरएफ जवानांनी महिला व बालकांना प्राधान्याने बाहेर काढलं.

एनडीआरएफ जवानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, या जवानाने हातात लहान जन्मलेलं मूल घेतलं आहे, अतिशय भावूक आणि मृत्यूच्या तांडवातही जगण्यास बळ देणारा हा क्षण वाटतो.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफ जवानांचे ट्विट रिट्विट करत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. कोकण आणि महाराष्ट्रातील पूर परिस्थितीत राबणाऱ्या एनडीआरएफ जवानांना सलाम, असे फडणवीस यांनी म्हटलंय.

फडणवीस यांनी जवानांचा हा कोल्हापुरातील फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये लहानग्याला मायेची उब देणारा जवान दिसून येत आहे.