WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?

WTC Final India’s Playing XI : इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे ( ICC World Test Championship Final 2021 ) तिकिट पक्कं केलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसीची मानाची ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आकडेवारीनुसार विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याला अद्याप आयसीसी एकही प्रमुख स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला हार मानावी लागली.

आता ती चूक कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराट कदापी होऊ देणार नाही आणि जेतेपदाचा दुष्काळ संपवेल. चार महिन्यांच्या लंडन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यांच्यासोबत 3 राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया प्रथमच परदेशात खेळणार आहे.

18 ते 23 जून या कालावधीत रंगणाऱ्या कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचे, यासाठी विराट आतापासून विचार करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा ही नावं अंतिम 11मध्ये पक्की मानली जात आहेत. पण, उर्वरित दोन जागांसाठी 11 उमेदवारा आहेत आणि त्यातून छाननी करणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

सलामीला कोण? - रोहित शर्मानं कसोटीतही सलामीला येऊन धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याच्यासोबतीला शुबमन गिल व मयांक अग्रवाल हे दोन पर्याय विराटसमोर आहेत. अशात अनुभवी मयांकला संधी द्यायची की युवा गिलवर विश्वास टाकायचा, हा प्रश्न संघाला सोडवायचा आहे. मयांकनं सातत्यपूर्ण कामगिरी केली नसली तरी न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याचा अनुभव त्याची बाजू वरचढ ठरवते. पण, त्याचवेळी गिलनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळालेल्या संधीत आत्मविश्वासानं खेळ करून निवड समितीला प्रसन्न केलं. तरीही रोहित व मयांक ही जोडी सलामीला उतरेल याची शक्यता अधिक आहे.

मधली फळी - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत ही तगडी फौज किवी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. लोकेश राहुल व हनुमा विहारी हे पर्याय विराटसमोर आहे, पण त्याच्यापैकी एकाला संधी देण्यासाठी एक गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू कमी करावा लागेल. हे विराटला परवडणारे नक्की नाही.

अष्टपैलू- रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानं टीम इंडियाची बाजू भक्कम केली आहे. त्यात आर अश्विननं गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर सातत्यपूर्ण खेळ केल्यानं त्याचेही अंतिम 11 मधील स्थान पक्के झाले आहे. भारतीय संघ अंतिम 11 मध्ये दोन फिरकीपटू + अष्टपैलू खेळाडूंसह उतरण्याची रणनिती नक्की आखेल. त्यांच्यासमोर अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय आहेत.

गोलंदाज - जडेजा व अश्विन यांच्या खेळण्यानं फिरकीची जबाबदारी वाटली गेली आहे. अशात जलदगती गोलंदाजात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंनाच पहिली पसंती असेल. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व उमेश यादव यांना बाकावर बसून रहावे लागेल.

संभाव्य अंतिम 11 - रोहित शर्मा, मयांक अग्रावाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व इशांत शर्मा