विराट कोहलीकडून शतक का होत नाहीय? नोंदवला गेला नकोसा विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा संपण्याची काही चिन्ह दिसत नाहीयत. भारतीय संघाच्या कर्णधाराकडून शतक का होत नाहीय? असा सवाल आता क्रिकेट चाहते उपस्थित करु लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं शतकी खेळी साकारलेली नाही. कोहलीनं आपलं शेवटतं आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये साकारलं होतं हे ऐकून कुणाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

कोहलीच्या नावावर आता नकोसा विक्रम जमा झाला आहे. १ मार्चपर्यंतचे दिवस मोजले असता गेल्या ४६५ दिवसांपासून विराट कोहलीचं शतक क्रिकेट चाहत्यांना पाहता आलेलं नाही. त्यानं २२ नोव्हेंबर २०१९ रोजी शेवटचं शतक ठोकलं होतं.

याआधी विराट कोहलीच्या दोन शतकांमधील सर्वाधिक अंतर हे २८२ दिवसांचं होतं. २४ डिसेंबर २००९ रोजी ठोकलेल्या शतकानंतर थेट ११ जानेवारी २०१० रोजी कोहलीचं शतक पाहायला मिळालं होतं.

त्यानंतर एकदा कोहलीचं शतक पाहण्यासाठी चाहत्यांना २३३ दिवसांची वाट पाहावी लागली होती. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी ठोकलेल्या शतकानंतर कोहलीनं थेट १७ ऑक्टोबर २०१४ मध्ये शतकी खेळी साकारली होती.

विराटच्या कारकिर्दीत दोन शतकांमध्ये सर्वाधिक कालावधी लागलेली चौथी घटना म्हणजे २०११ सालची. १९ फेब्रुवारी २०११ रोजी ठोकलेल्या शतकानंतर कोहलीनं २०९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर १६ डिसेंबर २०११ रोजी शतक साजरं केलं होतं.

याआधी २० जानेवारी २०१६ ते २१ जुलै २०१६ अशा १८३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोहलीनं शतक ठोकलं होतं. पण आता विराटनं शेवटचं शतक साजरं करुन तब्बल ४६५ दिवस झाले आहेत. त्यामुळे कोहलीचं शतक का होत नाहीय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.