Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अनेक मॅच विनिंग भागीदारी केली आहेत. आता कोरोना व्हायरचा मुकाबला करण्यासाठी हे दोघं पुन्हा एकत्र आले आहेत.

कोहली आणि डिव्हिलियर्सनं शुक्रवारी इंस्टाग्रामवर लाईव्ह चाट केली आणि तेथे त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली

RCBनं आयपीएल 2016च्या मोसमात गुजरात लायन्स संघावर 144 धावांनी विजय मिळवला होता आणि त्या सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स या दोघांनी शतक झळकावले होते.

त्या सामन्यात कोहलीनं 55 चेंडूंत 109 धावा चोपल्या होत्या. त्यात 8 षटकार आणइ 5 चौकारांचा समावेश होता.

डिव्हिलियर्सनंही 10 चौकार व 12 षटकारांसह 52 चेंडूंत 129 धावांचा पाऊस पाडला होता. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर RCBनं 20 षटकांत 3 बाद 248 धावांचा डोंगर उभा केला होता.

या सामन्यातील दोघांची जर्सी आणि त्या बॅटीचे लिलाव होणार आहे.

''आयपीएलमध्ये आम्ही दोघांनी अनेक चांगल्यी खेळी केल्या आहेत आणि मी त्या विसरणार नाही. 2016मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्धची आमची भागीदारी आजही चांगली लक्षात आहे. ती भागीदारी करताना आम्ही दोघांनीही फार आनंद घेतला. जर मी बरोबर असेन, तर मी 120पेक्षा अधिक धावा केल्या होत्या आणि तूही शतक झळकावलं होतं. एकाच सामन्यात दोन फलंदाज शतक झळकावण्याचा योगायोग रोज घडत नाही. पर्यावरणविषयक जनजागृती करणारा तो सामना होता आणि आपण हिरवी जर्सी घातली होती,'' असं एबी इस्टाग्राम लाईव्हवर कोहलीला सांगत होता.

तो पुढे म्हणाला,''मी त्या सामन्यातील अविस्मरणीय खेळीबाबत थोडा वेगळा विचार करत आहे. त्या सामन्यात आपण घातलेली जर्सी, ग्लोज आणि बॅट यावर आपली स्वाक्षरी आहे आणि त्याचं ऑनलाईन लिलाव करण्याचा विचार माझ्या डोक्यात सुरू आहे.''

एबीची ही कल्पना कोहलीला आवडली आणि त्यानंही त्याच्या बॅट व ग्लोजचा लिलाव करण्याचे मान्य केले. या लिलावातून उभा राहणारा निधी भारत आणि दक्षिण आफ्रिका येथील गरजूंच्या मदतीसाठी समसमान वाटण्यात येणार आहे.

''हा निधी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी गोळा केला जात आहे. या निधीतून गरजूंना अन्न पुरवले जाईल. लिलावातून जमा होणारा निधीचं 50-50 असे वाटप होईल,''असे एबी म्हणाला. कोहलीनंही या कल्पनेचं स्वागत केलं.