वेंकटेश प्रसादला डिवचणं पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरला महागात पडले; 'इंदिरानगरच्या गुंड्यानं' वाभाडे काढले!

दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावार धुमाकूळ घालत आहे. यात आता भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानं उडी घेतली आणि मजेशीर ट्विट केलं.

दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावार धुमाकूळ घालत आहे. 'इंदिरानगर का गुंडा' या नावानं तो व्हिडीओ ट्रेंड होत आहे. यात जंटलमन राहुल द्रविड चिडचिडा, भांडखोर आणि मारामारी करणारा दाखवला आहे. त्याच्या प्रतिमेच्या उलट ही व्यक्तिरेखा दाखवल्यानं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

राहुल द्रविडचा माजी सहकारी आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानं ( Venkatesh Prasad ) एक फोटो पोस्ट केला. त्यात त्यानं पाकिस्तानचा माजी फलंदाज आमीर सोहैल याच्यासोबतचा गाजलेला वाद दाखवून 'इंदिरानगरचा गुंडा' मी आहे अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्रसादच्या या ट्विटमधील फोटो हा १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यामधला आहे. या सामन्यात सोहैल व प्रसाद यांच्यात शाब्दिक चकमल उडाली होती. सोहैलनं दोन खणखणीत चौकार मारल्यानंतर प्रसादला बॅट दाखवली होती.

पण, प्रसादनं पुढच्याच चेंडूवर सोहैलचा त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जा असा रागात इशारा केला. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यातील वादाची चर्चा होते, तेव्हा हा किस्सा आवर्जुन येतोच. बंगळुरू येथील सामन्यात १५व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर प्रसादनं ही विकेट घेतली होती.

१९९६च्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं ३९ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता. २८८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला ९ बाद २४८ धावा करता आल्या होत्या. या सामन्यात प्रसादनं दहा षटकांत ४५ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रसादनं ३३ कसोटीत ९६ आणि १६१ वन डे सामन्यांत १९६ विकेट्स घेतल्या आहेत. ५ बाद २७ ही त्याची वन डे तील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

प्रसादचे हे ट्विट पाकिस्तानचा स्पोर्ट्स प्रझेंटरला आवडलं नाही आणि त्यानं लागलीच बोचरी टीका केली. त्यानं लिहिलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुझी ही एकमेव अचिव्हमेंट आहे. त्यावरून प्रसादनं जबरदस्त ट्विट करून पाकिस्तानी अँकरची बोलती बंद केली.

नजीब उल हस्नेनं असे त्या अँकरचं नाव आहे. त्यावर प्रसादनं रिल्पाय दिला,''नाही नजीब भाई. मी त्यानंतरही अनेक अचिव्हमेंट मिळवल्या आहेत. पुढच्याच म्हणजेच १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मँचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्ध २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानला २२८ धावांचाही पाठलाग करता आला नव्हता.''