ख्रिस गेलनं ट्वेंटी-20 खेचले १००० Six; पण, कोणत्या संघाकडून किती ते माहित्येय?

Universe Boss ख्रिस गेलनं ( Chris Gayle) आज ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अश्यक्यप्राय विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० षटकार ( Sixes) खेचणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या किरॉन पोलार्डच्या खात्यात ६९० षटकार आहेत. म्हणजे गेलच्या आसपासही कुणी नाही.

ख्रिस गेलनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकूण १३,५७२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात षटकार ( ६००६) आणि चौकार ( ४१६४) यातून आलेल्या धावा या १०१७० आहेत. म्हणजेच कारकिर्दीतील एकूण धावांपैकी ७४.९३% धावा या त्यानं चौकार व षटकार खेचून केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गेलनं ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावा केल्या. ट्वेंटी-20त सर्वाधिक २२ शतकं नावावर असलेल्या गेलला कारकिर्दीत दोनदा ९९ धावांवर समाधान मानावे लागले.

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ५+ षटकार मारण्यात गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्यानं २९ वेळा हा पराक्रम केला. एबी डिव्हिलियर्स ( १८), किरॉन पोलार्ड ( १२), शेन वॉटसन ( ११) व रोहित शर्मा ( १०) यांचा क्रमांक येतो

गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११ स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात सातवेळा त्याने २२ पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक चौकार (१०२६) लगावण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.

IPLच्या चार पर्वांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यानं 2011 ( 44 षटकार), 2012 ( 59 षटकार), 2013 ( 51 षटकार) आणि 2015 ( 38 षटकार) या पर्वांत ही कामगिरी केली आहे. या चारही पर्वात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळला होता.

2013मध्ये त्यानं RCBकडून खेळताना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद 175 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 17 चौकारांची आतषबाजी केली होती. ट्वेंटी-20त एका सामन्यात सर्वाधिक 18 षटकाराचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. पण, त्यानं हा विक्रम बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये केला होता.

IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्स ( 232 षटकार) आणि महेंद्रसिंग धोनी ( 216) यांचा क्रमांक येतो. ट्वेंटी-20त गेलनंतर सर्वाधिक षटकारांचा विक्रम किरॉन पोलार्डच्या ( 690) नावावर आहे. रोहित शर्मा ( 376) आणि विराट कोहली ( 296) हे कोसो दूर आहेत.

गेलनं जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये २६ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापैकी किमान २४ संघांकडून त्यानं ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार खेचले आहेत. पीसीए मास्टर XI आणि वेस्ट इंडीयन्स यांच्याकडून त्याला अनुक्रमे २ व १ सामन्यांत एकही षटकार मारता आलेला नाही.

गेलनं सर्वाधिक षटकार हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मारले आहेत. त्यानं ९१ सामन्यांत २६३ चौकार व २६३ षटकार खेचले आहेत.

त्यानंतर जमैकन थलाव्हास आणि वेस्ट इंडिज यांच्यासाठी अनुक्रमे १२४ व १०५ षटकार त्याने मारले. त्यापाठोपाठ किंग्स इलेव्हन पंजाब ( ८४), रंगपूर रायडर्ड ( ६०), समरसेट ( ४२) यांचा क्रमांक येतो.

सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स यांच्यासाठी त्यानं ३८, सिडनी थंडर्ससाठी २७, बॅरीसल बर्नर्स, जमैका व कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्रत्येकी २६ षटकार मारले आहेत.

मेलबर्न रेनेगाड्स ( २०), मॅटावेलेलँड टस्कर्स ( १९), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( १७), कराची किंग्स ( १४), बॅरीसल बुल्स, चत्तोग्राम चॅलेंजर्स, ढाका ग्लॅडीएटर्स व लायन्स ( SA T20) ( प्रत्येकी १२), चित्तगांव विकिंग्स ( १०), जोझी स्टार्स ( ८), लाहोर कलंदर्स ( ८) आणि स्टॅनफोर्ड सुपर स्टार ( ५) यांच्याकडून त्यानं षटकार खेचले आहेत.