क्रिकेटमधील गेल्या दशकातील पाच धक्कादायक क्षण

ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका यांच्यात 2012मध्ये झालेल्या तिरंगी वन डे मालिकेतील कामगिरीनंतर रिकी पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाला दोन वन डे वर्ल्ड कप जिंकून जेणाऱया कर्णधाराला अखेरच्या वन डे मालिकेत समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्याला पाच सामन्यांत केवळ 18 धावा करता आल्या आणि तेव्हाच त्यानं वन डेतून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याच वर्षी त्यानं नोव्हेंबर महिन्यात कसोटीतून निवृत्ती घेतली.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडले, तो क्षण याच दशकात चाहत्यांनी अनुभवला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या वन डे सामन्यापूर्वी तेंडुलकरला निवृत्ती घेण्यास भाग पाडले. दहा दिवसांनंतर तेंडुलकरने निवृत्ती घेतली. ''12 डिसेंबर 2012मध्ये सचिनशी आम्ही भेट घेतली आणि त्याला भविष्याबद्दल विचारले. त्याच्या डोक्यात निवृत्तीचा विचार नव्हता, परंतु निवड समितीनं पक्का निर्णय केला होता आणि त्याची माहिती बीसीसीआयला दिली गेली होती. सचिनलाही ते समजलं आणि त्यानं पुढच्या बैठकीपूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला,''अशी माहिती तेव्हाचे निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी 2016मध्ये ABP माझाला दिलेल्या मुलाखतीतून दिली. 2011 वर्ल्ड कपनंतर तेंडुलकर केवळ 10 वन डे सामने खेळला, त्यातही त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

तिहेरी शतक झळकावूनहही करूण नायर याला टीम इंडियाच्या अंतिम अकरा खेळाडूंमधून डावलण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. 2017मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेसाठी नायरला संघाबाहेर केले गेले. कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले. नायरसोबत असे वारंवार घडले. 2018च्या इंग्लंड कसोटी मालिकेत पाचव्या कसोटीत नायरचे खेळणे निश्चित होते, परंतु कोहलीनं हनुमा विहारीला संधी दिली. विहारीनं अर्धशतक व तीन विकेट घेत त्याची निवड सार्थ ठरवली. पण, नायर अजूनही कसोटी संघात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या 2018मधील ट्वेंटी-20 मालिकेतून महेंद्रसिंग धोनीला संघात न मिळालेले स्थान हे धक्कादायक होते. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंत याची निवड केली. पण, त्यानंतर धोनी अजूनही ट्वेंटी-20 मालिका खेळलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि आगामी इंडियन प्रीमिअर लीगमधील कामगिरी त्याचे भवितव्य ठरवेल.

श्रीलंका संघाकडून ट्वेंटी-20 मालिकेत सुफडा साफ झाल्यानंतर पाकिस्तानच्या निवड समितीनं सर्फराज अहमदची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला कसोटी व ट्वेंटी-20 संघातूनही वगळण्यात आले.