टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

न्यूझीलंड दौऱ्यात ट्वेंटी-20 मालिकेत 5-0 असा दणक्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला वन डे आणि कसोटी मालिकेत सपशेल मार खावा लागला. कसोटी मालिकेतील पराभव टीम इंडियाच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या मोहीमेला धक्का देणारा ठरला आहे.

न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत 10 विकेट्स आणि दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्स राखून सहज विजय मिळवताना टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सर्व मर्यादा उघड केल्या. पण, टीम इंडियाच्या या पराभवाला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड जबाबदार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) काही अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

दी वॉल राहुल द्रविडनं भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यानं युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा पर्याय निवडला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं 19 वर्षांखालील वर्ल्ड कपही उंचावला. पण, हाच द्रविड आता चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

द्रविड सध्या बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. बंगळुरु येथे असलेल्या या अकादमीवर भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळेच दुखापतग्रस्त खेळाडू पुन्हा मैदानावर परतण्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी त्या अकादमीत दाखल होतात.

त्यामुळे द्रविडच्या परवानगीशिवाय खेळाडूला तंदुरुस्त असल्याचा दाखला मिळत नाही. पण, ही अकादमी अनेकदा चर्चेत आली आहे. कारण, येथे दाखल झालेल्या बऱ्याच खेळाडूंची दुखापत बरी होण्याएवजी अधिक बळावल्याची उदाहरणं आहेत.

इशांत शर्मा हे त्याचं ताजं उदाहरण आहे. रणजी करंडक स्पर्धेत दुखापत झालेला इशांत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आणि तेथे पुन्हा दुखापतग्रस्त होऊन बाकावर बसला. राष्ट्रीय अकादमीनं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याच्या तीन दिवसांपूर्वी इशांतला तंदुरुस्त म्हणून घोषित केले होते.

इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार इशांत शर्माच्या दुखापतीबाबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून द्रविडनं जबाबदारी स्वीकारावी, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटते.

बीसीसीआयचे अधिकाऱ्याने सांगितले की,''इशांत शर्माला तंदुरुस्त जाहीर कसे केले, हे आश्चर्यजनकच होते. द्रविड हा देशातील आदरयुक्त व्यक्ती आहे. पण, आता द्रविड राष्ट्रीय अकादमीचा प्रमुख आहे, तर त्यानं ही जबाबदारी स्वीकारावी.''

यापूर्वी राष्ट्रीय अकादमीनं जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास नकार दिला होता.

बुमराह पर्सनल फिजिओकडून उपचार घेत होता, त्यामुळे त्यानं तंदुरुस्तीची चाचणी त्यांच्याकडूनच करून घ्यावी असे राष्ट्रीय अकादमीचे म्हणणे होते.