Sunil Gavaskar : लोकेश राहुलचे अपयश हे टीम इंडियासाठी फायद्याचे ठरले; रोहित शर्मा-विराट कोहली जोडीबाबत सुनील गावस्कर स्पष्टच बोलले

Sunil Gavaskar विराट कोहलीच्या सलामीला येण्यावर सुनील गावस्कर यांनी स्पष्ट मत मांडले.

कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि उप कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात सलामीला येताना आक्रमक खेळी केली. आतापर्यंत या मालिकेत भारतीय सलामीवीरांना साजेशी सुरूवात करून देता आली नव्हती, परंतु विराट-रोहितनं सर्व चित्र बदललं. निर्णायक सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली.

रोहित शर्मानं काल नेहमीच्या शैलीत आक्रमक खेळ केला. त्यानं ३४ चेंडूंत ५ षटकार व ४ चौकारांसह ६४ धावा चोपल्या. विराटनं रोहितसोबतच्या ९४ धावांच्या भागीदारीत २० चेंडूंत २२ धावांचे योगदान दिले. पण, रोहित माघारी परतल्यानंतर विराटनं धमाका केला अन् त्यानं ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह नाबाद ८० धावांची खेळी केली.

''संघातील सध्याच्या खेळाडूंचा फॉर्म कसा आहे हे पाहणे गरजेचे आहे आणि कोणत्या परिस्थितीत, कोणत्या प्रतिस्पर्धीविरुद्ध कोणते अंतिम ११ शिलेदार उतरवायचे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. काहीवेळेतस अंतिम ११मध्ये सहा गोलंदाज असावेत असे वाटते आणि त्यामुळे एका फलंदाजाला बाकावर बसवावे लागते. जसजसा वर्ल्ड कप जवळ येईल, तेव्हा या सर्वा गोष्टींचा विचार केला जाईल. त्यामुळे जर विराट कोहलीसोबत सलामीला जाणं हे संघहिताचं असेल, तर त्याची अंमलबजावणी नक्की होईल,''असे रोहित शर्मानं स्पष्ट केलं.

विराटनं आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाकडून सलामीला खेळणार असल्याचे जाहीर केले. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितसोबत सलामीला खेळण्यास आवडेल, असेही तो म्हणाला.

विराट कोहली ८व्यांदा टीम इंडियासाठी सलामीला येणार आहे. जून २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध तो अखेरचा सलामीला आला होता. त्यानं सलामीवीर म्हणून ८ ट्वेंटी-20 सामन्यांत २७८ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे आणि इंग्लंडविरुद्धची नाबाद ८० धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.

विराट व रोहितच्या दमदार खेळीनंतर सूर्यकुमार यादव ( ३२) व हार्दिक पांड्या ( ३९*) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना भारताला २२४ धावांचा डोंगर उभा करून दिला. इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत करून भारतानं ही मालिका ३-२ अशी जिंकली. या विजयानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( former India captain Sunil Gavaskar ) यांनी विराट कोहली - रोहित शर्मा या जोडीनंच ट्वेंटी-२०त सलामीला यावं, असं मत व्यक्त केलं.

लोकेश राहुलचा खराब फॉर्म कदाचित भारतीय संघासाठी आशीर्वाद घेऊन आला आहे. नाहीतर विराट व रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सलामीला येतील असे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते, असे गावस्कर म्हणाले. '' मर्यादित षटकांच्या सामन्यात तुमच्याकडील सर्वोत्तम फलंदाजांना सर्वाधिक चेंडू खेळायला मिळायला हवे. त्यामुळे विराट कोहलीनं टॉप ऑर्डरवर खेळावे, हे अत्यंत महत्त्वाचे होते. लोकेश राहुलच्या अपयशानं सलामीला वेगळ्या जोडीचा विचार करण्याची संधी मिळाली,''असे गावस्कर म्हणाले.

या मालिकेत लोकेश राहुलला चार सामन्यांत तीन वेगवेगळ्या जोडीसोबत सलामीला खेळण्याची संधी दिली गेली. परंतु त्याला १, ०, ० व १४ अशाच धावा करता आल्या. त्यामुळे पाचव्या सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली.

विराटनं स्वतःला सलामीला खेळवून महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्या पावलावर पाऊल ठेवले. ''वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर मधल्या फळीत खेळायचा आणि त्यानंतर तो सलामीला येऊ लागला. त्यानंतर त्याची कामगिरीच फक्त उंचावली नाही, तर संघालाही फायदा झाला. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूनेच अधिक चेंडू खेळायला हवेत, हे स्पष्ट आहे,'' असे गावस्कर म्हणाले.