अ‍ॅशेस मालिका : स्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक, कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

बर्मिंगहॅम, अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथनं एका वर्षांच्या बंदीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच कसोटीत त्यानं सलग दोन शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. त्यानं कसोटी क्रिकेटमधले 25वे शतक झळकावताना ऑस्ट्रेलियाला 398 धावांची आघाडी मिळवून दिली. स्मिथने पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले.

स्टीव्ह स्मिथची हे कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक ठरले. या कामगिरीसह त्यानं कोहली आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांच्या 25 कसोटी शतकांशी बरोबरी केली. स्मिथनं 119 डावांत हा पल्ला गाठला आणि कोहलीला मागे टाकले. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन 68 डावांसह अव्वल स्थानावर आहेत. कोहली ( 127 डाव), सचिन तेंडुलकर ( 130 डाव ) आणि सुनील गावस्कर ( 138 डाव) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.

अ‍ॅशेस मालिकेतील स्मिथचे हे दहावे शतक ठरले. या कामगिरीसह स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकांचा पुरस्कार सर डॉन ब्रॅडमन ( 19) आणि जॅक हॉब्स ( 12) हे आघाडीवर आहेत. याशिवाय इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणाऱ्या ब्रॅडमन, वॉ, अ‍ॅलन बॉर्डर आणि मार्क टेलर यांच्या पंक्तीत स्थान पटकावले आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील एका कसोटीत दोन शतकं करणारा स्मिथ हा पाचवा ऑस्ट्रेलियन आणि एकूण आठवा फलंदाज आहे. त्याच्याआधी वॅरेन बॅर्डस्ली, ऑर्थर मॉरिस, स्टीव्ह वॉ आणि मॅथ्यू हेडन यांनी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडसाठी हर्बर्ट सुटक्लि, वॅली हॅमोंड आणि डेनीस कॉप्टन यांनी ही कामगिरी केली आहे. 2002-03च्या अ‍ॅशेस मालिकेनंतर प्रथमच एका कसोटीत एका फलंदाजानं दोन शतकं झळकावली आहेत.

स्मिथनं अ‍ॅशेस मालिकेतील मागील 10 कसोटीत सहा शतकं झळकावत 1116 धावा केल्या आहेत. त्यानं मागील 10 डावांत 139.5 च्या सरासरीनं 141*, 40, 6, 239, 76, 102*, 83, 144, 142 धावा केल्या आहेत. अ‍ॅशेस मालिकेच्या दहा डावांत सर्वात यशस्वी फलंदाजीचा विक्रम सर डॉन ब्रडमन ( 1236) यांच्या नावावर आहे.

अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्याच कसोटीत स्मिथनं 286 धावा केल्या. एका कसोटीतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी त्यानं 2015च्या लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीत 273 ( 215/58) धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटींच्या 50 वर्षांच्या इतिहासात एकाच सामन्यात 250+ धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावांत 140+ धावा करणारा स्मिथ हा चौथा फलंदाज आहे. याआधी अ‍ॅलन बॉर्डर, अँडी फ्लॉवर आणि तिलकरत्ने दिलशान यांनी अशी कामगिरी केली आहे.