वाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती, परंतु सद्यपरिस्थिती पाहता वर्ल्ड कप होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे.

28 मे ला होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात ही बैठक होणार असून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 2022पर्यंत स्थगित करण्यात येईल, असे संकेत आयसीसीच्या सूत्रांनी दिले आहेत.

''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याची शक्यता अधिक आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. सद्यस्थितित ही स्पर्धा होण्याची फार तुरळक शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि अन्य मंडळांना या निर्णयाचं आश्चर्य वाटणार नाही,''असे आयसीसीच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

पण, ही वाईट बातमी भारतीय चाहत्यांसाठी एक चांगली बातमीही घेऊन आली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याची घोषणा झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर विंडोत बीसीसीआय आयपीएल खेळवण्याचा विचार करू शकते.

29 मार्च ते 24 मे 2020 या कालावधीत आयपीएल स्पर्धा होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढल्यानं बीसीसीआयनं पुढील सुचनेपर्यंत ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

पण, बीसीसीआयनं आयपीएलचा 13वा हंगाम 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यासाठी कंबर कसली होती. आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास, त्यांचा हा मार्ग मोकळा होऊ शकतो.

दुसरीकडे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्च 2021मध्ये खेळवण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आयपीएल 14 खेळवण्यात येईल.

आयपीएलचा 13 वा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्यास सहा महिन्यांत क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या दोन मोसमाचा आस्वाद घेता येणार आहे. मार्च-मे 2021मध्ये पुन्हा आयपीएल खेळवण्यात येईल.

या कालावधीत बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, तर इंग्लंड भारत दौऱ्यावरही येणार आहे.

त्यामुळे आयपीएल 13, ऑस्ट्रेलिया दौरा, इंग्लंडचा भारत दौरा आणि आयपीएल 14 असा असेल टीम इंडियाचा पुढील सहा महिन्यांचा कार्यक्रम.

Read in English