शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत!

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी सोशल मीडियापासून दूरच आहे. पण, त्याच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच काम सुरूच आहे. त्याची माहिती तो वेळोवेळी ट्विटरवर देत आहे.

आफ्रिदीनं कोरोनावर मात केली असून तो पुन्हा लोकांच्या मदतीसाठी सक्रीय झाला आहे. समाजकार्याबरोबरच आफ्रिदी त्याच्या बेताल वक्तव्यामुळेही चर्चेत असतो.

दोन आठवड्यांपूर्वी त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती आणि त्याला सडेतोड उत्तरही दिलं गेलं. पण, आता आफ्रिदीनं स्वतःच्याच देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली आहे.

आफ्रिदीनं पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर टीका केली. त्याच्या मते इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळात एकात्मतेची उणीव आहे आणि संपूर्ण पाकिस्तान ते पाहत आहे. गतवर्षी आफ्रिदी पंतप्रधानांबरोबर दिसला होता. तो म्हणाला की,'कोरोना व्हायरसच्या संकटात मी देशातील गरजूंना मदत करण्यासाठी भटकत होतो, तेव्हा खान यांचे काही मंत्री आणि खासदार त्याच विभागात सुट्टीसाठी फिरत होते.'

शाहिद आफ्रिदी 13 जूनला कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर सोमवारी त्यानं एका मुलाखतीत अऩेक मुद्द्यांवर चर्चा केली. तो म्हणाला,''मलाही कोरोनाची लागण होऊ शकते, याची मला जाण होती आणि तेच झाले. आता मी पूर्णपणे बरा आहे. मी क्वारंटाईन झालो नाही. तीन दिवसांनंतर रुमबाहेर आलो आणि सरावाला सुरुवात केली. या आजारात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाची आहे. निष्काळजीपणा करू नका.''

एका प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला,''कोरोना व्हायरस मोठी गोष्ट नाही. ती निघून जाईन. गरीबी आणि बेरोजगारी ही आमच्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. कोरोना व्हायरसशी तर आम्ही यशस्वी मात करू. पण, गरीबी आणि बेरोजगारांचे काय करणार, याचा विचार करायला हवा.''

''सरकारकडून अहसास प्रोग्राम सुरू आहे. पण, लोकांना रेशन मिळत नाही. क्वेटा येथील लोकांन मदतीसाठी मी गेलो होतो. तिथे त्यांना रेशन वाटलं. पण, आमचेच काही मंत्री व खासदार तिथे सुट्टीसाठी भटकत होते, हे सांगताना मला दुःख होत आहे. रस्त्यात मिळणाऱ्या गरीबांच्या यातना त्यांना दिसल्या नसतील का?,''असाही सवाल आफ्रिदीनं केला.

इम्रान सरकारवर टीका करताना आफ्रिदी म्हणाला,''आमच्या नेत्यांना वरच्यांनी खुर्ची आणि ताकद दिली आहे. पण, ही लोकं गरीबांना मदत करत नाहीत. माझ्याकडे खुर्ची नाही, परंतु स्वच्छ मन आहे. मला खुर्ची नकोय. इम्रान खान यांच्या टीममध्ये एकात्मतेची उणीव आहे.''