India vs South Africa : रिषभ पंतसह टीम इंडियाच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

चंदिगड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : उभय संघातील पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. आज चंदिगड येथे दुसरा ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्याचबरोबर या मालिकेत टीम इंडियाच्या काही युवा खेळाडूंवरही सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

नवदीप सैनी - आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या या युवा गोलंदाजानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सैनीनं विंडीज दौऱ्यात तीन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या.

राहुल चहर - डावखुरा फिरकीपटू राहुल चहरनेही विंडीज दौऱ्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. पण, आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता आफ्रिकेविरुद्ध त्याला संधी दिली जाऊ शकते.

वॉशिंग्टन सुंदर - तामिळनाडूच्या या 19 वर्षीय फिरकीपटूनं टीम इंडियाकडून आतापर्यंत 10 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 12 विकेट्स घेतल्या आहेत.

रिषभ पंत - महेंद्रसिंग धोनीनंतर टीम इंडियाचा यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत आघाडीवर आहे. निवड समितीनंही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पंतलाच पसंती दर्शवली आहे. पण, त्याला कामगिरीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यानं 18 ट्वेंटी-20 सामन्यात 21.57च्या सरासरीनंच धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यर - वेस्ट इंडिज दौऱ्यावर चौथ्या क्रमांकावर मिळालेल्या संधीचं सोनं करताना श्रेयस अय्यरनं आपले नाणं खणखणीत वाजवलं आहे.