Play off scenario IPL 2020 : ५२ सामन्यांनंतर एकच संघ ठरला पात्र; ४ सामने शिल्लक अन् तीन जागांसाठी ६ संघांमध्ये रस्सीखेच!

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला पराभवाचा धक्का दिला. SRHनं पाच विकेट्स राखून सामना जिंकून Play Offच्या आशा जीवंत ठेवल्या. पण, हैदराबादच्या विजयानं अन्य संघांची धाकधुक वाढवली आहे.

संदीप शर्मा ( २/२०) व जेसन होल्डर ( २/२७) यांच्यासह अन्य गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हैदराबादनं प्रथम फलंदाजी करणाऱ्या RCBला ७ बाद १२० धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

RCBसाठी जोस फिलिप ( ३२), एबी डिव्हिलियर्स ( २४), वॉशिंग्टन सुंदर ( २१), गुरकिरत मन सिंग ( १५*) यांनी कडवा संघर्ष केला.

प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर ( ८) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर वृद्घीमान सहा ( ३९) व मनीष पांडे ( २६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHची गाडी रुळावर आणली.

जेसन होल्डरनं १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद २६ धावा केल्या. हैदराबादनं १४.१ षटकांत ५ बाद १२१ धावा करून विजय पक्का केला.

या विजयानंतर SRHनं सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानी झेप घेतली. हैदराबादनं १३ सामन्यांत ६ विजय मिळवत १२ गुण खात्यात जमा केले आहेत.

५६ सामन्यांच्या लीगमध्ये ५२ सामन्यांनंतर केवळ एकच संघ ( मुंबई इंडियन्स) प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे, तर चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेबाहेर गेला आहे.

त्यामुळे प्ले ऑफच्या उर्वरित ३ जागांसाठी सहा संघ शर्यतीत आहेत आणि चार सामन्यांत त्यांचे भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सनं १८ गुणांसह त्यांचे स्थान पक्के केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व दिल्ली कॅपिट्स प्रत्येकी १४ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. RCB चा नेट रनरेट -०.१४५ इतका आहे, तर DCचा -०.१५९ इतका आहे.

१४ गुणांनंतरही RCB व DC यांचे स्थान पक्के नाही. विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात हे संघ एकमेकांसमोर आहेत आणि विजयी संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाला अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

SRHनं आजच्या विजयासह दोन गुणांची कमाई करताना खात्यातील संख्या १२ वर नेली. त्यांचा नेट रन रेट हा +०.५५५ असा असल्यानं अखेरच्या सामन्यात विजय मिळवताच ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतील. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचा अखेरचा सामना आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबच्या खात्यात १२ गुण आहेत आणि अखेरच्या सामन्यात त्यांच्यासमोर चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान आहे. पंजाबला विजयासह अन्य संघांच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. पंजाबचा नेट रन रेट -०.१३३ असा आहे.

राजस्थान रॉयल्स यांच्या खात्यातही १२ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट हा -०.३७७ इतका आहे. त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. या सामन्यातील विजेता संघ प्ले ऑफच्या शर्यतीत किंचित आघाडी घेऊ शकेल. शिवाय त्यांना अन्य निकालावरही अवलंबून रहावे लागेल.

कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यातही १२ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट ( -०.४६७) हा इतरांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांनाही अखेरच्या सामन्यात विजयासह अन्य निकालावर लक्ष ठेवावे लागेल.

Read in English