PSL यशस्वी करण्यासाठी पाकिस्ताननं आयपीएलमधून ढापल्या आयडिया

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्ताननेही आयपीएलप्रमाणेच आपली पीएसएल ही लीग सुरू केली आहे.

भारतात टी-२० क्रिटेकची आयपीएल ही लीग कमालीची यशस्वी झाली आहे. आयपीएलला मिळालेल्या या यशानंतर अनेक देशांनी टी-२० लीग सुरू केल्या आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्ताननेही आयपीएलप्रमाणेच आपली पीएसएल ही लीग सुरू केली आहे. मात्र पीएसएलला यशस्वी ठरवण्यासाठी पाकिस्तानने आयपीएलमधील अनेक कल्पना जशाच्या तशा उचलल्या आहेत.

सुरुवातीच्या काही हंगामांनंतर बाद फेरीचे सामने अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी आयपीएलमध्ये प्ले ऑफ लढती सुरू करण्यात आल्या होत्या. यात उपांत्य लढतींऐवजी क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने खेळवले जातात.

आता पाकिस्तानमधील पीएसएलमध्ये प्ले ऑफ लढती आणि क्वालिफायर आणि एलिमिनेटरची कल्पना जशीच्या तशी उचलण्यात आली आहे.

आयपीएलने क्रिकेट आणि सिनेसृष्टीतील तारेतारकांचा जबरदस्त मेळ साधला होता. त्यामुळे या स्पर्धेला ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झाले. शाहरुख खान, प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी यांचे आयपीएलमध्ये संघही आहेत. तसेच बॉलिवूडमधील इतर तारे तारकाही या स्पर्धेला उपस्थित राहत असतात.

आता पीएसएलमध्येही पाकिस्तानने आयपीएलमधील ही आयडिया कॉपी केली आहे. पाकिस्तानमधील लॉलिवूडमधील अभिनेते पीएसएलच्या लढतींना उपस्थित राहत असता. तसेच अनेक सेलेब्रेटी विविध संघांना समर्थन देतात.

आयपीएलमधून बक्षीस वितरणासाठी नेहमीपेक्षा वेगळी पद्धत आणली गेली. यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजास पर्पल कॅप, उगवत्या खेळाडूस इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार अशी बक्षीसे दिली जातात.

पीएसएलमध्येही अशाच प्रकारच्या बक्षीसांची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजास मरून कॅप तर सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजास ग्रीन कॅप दिली जाते. त्याशिवाय चांगला खेळ खेळणाऱ्या खेळाडून खेळभावना पुरस्कार दिला जातो.

आयपीएलमध्ये इतर बाबींसोबत खेळाडूंच्या गणवेशावरही विशेष लक्ष्य केंद्रित केलेले आहेत. lत्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे ड्रेस आकर्षक असता.

आयपीएलमधील ही ड्रेसिंग सेन्सची कल्पनाही पाकिस्तान सुपर लीगमध्ये कॉपी केली गेली आहे.

क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ न शकणाऱ्यांसाठी आयपीएलचे सामने सुरू असताना विविध शहरात फॅन्स पार्क सुरू करण्यात आले आहेत. तसेच व्हीआयपी बॉक्स, सुपरफॅन स्पर्धाही घेतली जाते.

आता पीएसएलनेदेखील फॅन्स पार्क सुरू केले आहेत. पीएसएलमधील विविध फ्रॅन्चायझी पीएसएलच्या यशाच्या दृष्टीने फॅन्स पार्क हे पुढचे पाऊल मानत आहेत.