Big Bash Leagueमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंची नावं जाहीर; महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांचं आहे का नाव?

महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंग भारतीय क्रिकेटमधील दोन स्टार खेळाडू आगामी Big Bash League मध्ये खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

युवीनं २०१९ आणि धोनीनं २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवीनं तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कॅनडात पार पडलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळलाही.

धोनीनं १५ ऑगस्टला फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात खेळलाही.

आयपीएलनंतर धोनी व युवराज सिंग बिग बॅश लीगमध्ये खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे. १० डिसेंबर २०२० ते ६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंची नावं नुकतीच जाहीर केली गेली.

यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये तीन नवीन नियमांचाही समावेश करण्यात आला आहे. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Bash Boost - या नियमाचा दोन्ही संघांना समान फायदा असेल. डावाच्या मध्यंतराला दोन्ही संघाला बोनस गुण मिळवण्याची संधी आहे. जर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या १०व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या १० षटकांत केल्या, तर त्यांना १ बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं १० षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल.

X-factor Player - हा खूप मजेशीर नियम आहे. आता कर्णधारांना ११ खेळाडूंची नव्हे तर १२ किंवा १३ खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या १०व्या षटकानंतर १२ वा किंवा १३ वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम ११मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो. पण, अट अशी राहिल की ज्या खेळाडूला बदली करणार आहे, त्यानं फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.

Power Surge - या नियमानुसार सहा षटकांचा पहिला पॉवर प्ले हा चार षटकांचा केला गेला आहे. उर्वरित दोन षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना ११व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील दोन षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त दोनच खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.

या लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर, ब्रिस्बन हिट, हॉबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्कॉचर्स, सिडनी सिक्सर्स व सिडनी थंडर्स असे आठ संघ खेळणार आहेत. आतापर्यंत या संघांनी करारबद्ध केलेल्या परदेशी खेळाडूंची नावे जाणून घेऊया..

स्ट्रायकर्स - राशिद खान, फिल सॉल्ट, डॅनी ब्रिग्स; ब्रिस्बन हिट - टॉम बँटन, मुजीब उर रहमान, डॅन लॉरेन्स, लुईस ग्रेगोरी; हॉबर्ट हरिकेन्स - डेव्हिड मलान, किमो पॉल, कॉलीन इंग्राम, जॅन डोरेन; मेलबर्न स्टार्स - जॉनी बेअरस्टो, निकोलस पुरन, झहीर खान; पर्थ स्कॉचर्स - लिएम लिव्हिंगस्टोन, जेसन रॉय, कॉलीन मुन्रो, क्लार्क; सिडनी सिक्सर्स - टॉम, व्हिन्स, कार्लोस ब्रेथवेट; सिडनी थंडर्स - सॅम बिलिंग, अॅलेक्स हेल, मिल्ने.

Read in English