MI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. CSKविरुद्धचा पराभव विसरून मुंबई इंडियन्सने आज जी फटकेबाजी केली ती लाजवाब होती.

रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना हतबल केले. घरी बसून त्याच्या फकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येक चाहत्याला आपण स्टेडियममध्ये का नाही याची खंत नक्कीच वाटली असेल.

रोहित- सूर्यकुमार यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने मोठी धावसंख्या उभारता आली असती, परंतु अखेरच्या षटकात विकेट गमावल्यानं MI ला दोनशेपार जाता आले नाही. या सामन्यात रोहित शर्मानं अनेक विक्रमांना गवसणी घातली.

रोहितने पॅट कमिन्सला धु धु धुतले... पण, 18व्या षटकात रोहितचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. शिवम मावीनं ( Shivam Mavi) रोहितला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या.

आयपीएलमध्ये रोहित शर्माने KKRविरुध्द 904 धावा केल्या आहेत. एखाद्या फलंदाजाने आयपीएलच्या एकाच संघाविरुध्द केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

प्रत्येक संघाविरुद्ध कुणी सर्वाधिक धावा केल्यात? - 904 - रोहित शर्मा वि. कोलकाता नाइट रायडर्स, 829 - डेव्हिड वॉर्नर वि. कोलकाता नाइट रायडर्स, 825 - विराट कोहली वि. दिल्ली कॅपिटल्स, 819 - डेव्हिड वॉर्नर वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 818 - सुरेश रैना वि. कोलकाता नाइट रायडर्स, 818- सुरेश रैना वि. मुंबई इंडियन्स, 814- सुरेश रैना वि. किंग्स इलेव्हन पंजाब.

आयपीएलमधील रोहितचे हे 38वे अर्धशतक आहे. यासह त्यानं एबी डिव्हिलियर्सचा ( 37 अर्धशतक) विक्रम मोडला. सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर ( 48), विराट कोहली ( 41), सुरेश रैना ( 39) हे आघाडीवर आहेत.

रोहितनं IPLमध्ये 190 सामन्यांत 4990 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 109 धावांच्या खेळीसह 37 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 436 चौकार व 200 षटकार खेचले आहेत.

IPL मध्ये दोनशे षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला. ख्रिस गेल ( 326), एबी डिव्हिलियर्स ( 214) आणि महेंद्रसिंग धोनी ( 212) अव्वल तीन स्थानावर आहेत. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांत तो 6व्या स्थानावर आहे.