IPL Auction 2020: मुंबई इंडियन्स 'या' पाच खेळाडूंना घेणार आपल्या ताफ्यात!

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) मोसमाच्या लिलावासाठी कंबर कसली आहे. रिलीज केलेल्या खेळाडूंनंतरही मुंबई इंडियन्सचा संघ संतुलित आहे. पण, तरीही काही जागा भरून काढण्यासाठी ते काही खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी आग्रही आहेत.

यशस्वी जैस्वाल - मुंबईच्या या खेळाडूनं आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या टीम इंडियात स्थान पटकावलं. 17 वर्षीय यशस्वीनं लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली. त्यानं 154 चेंडूंत 203 धावा केल्या. त्यात 17 चौकार व 12 षटकार खेचले.

विराट सिंग - मुंबई इंडियन्सच्या चमून सध्या असलेल्या इशान किशन हा फॉर्माशी झगडत आहे. त्यामुळे त्याला बॅकअप म्हणून झारखंडच्या विराट सिंगच्या नावाचा विचार होऊ शकतो. विराटनं स्थानिक क्रिकेटमध्ये 10 सामन्यांत 57 च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत.

पंकज जैस्वाल - आशिया चषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला झालेली दुखापत आणि त्यानंतर तंदुरुस्तीसाठी तो घेत असलेली मेहनत लक्षात घेता त्याला राखीव म्हणून पंकज जैस्वालची निवड केली जाऊ शकते. हिमाचल प्रदेशच्या या खेळाडूनं रणजी करंडक स्पर्धेत दुसरे सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 20 चेंडूंच 4 चौकार व 7 षटकारांसह 63 धावा केल्या होत्या. त्यानं गोलंदाजीतही 37 सामन्यांत 55 विकेट्स घेतल्या आहेत.

ख्रिस ग्रीन - ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज अशी ग्रीनची ओळख आहे. मयांक मार्कंडेला रिलीज केल्यानंतर मुंबई इंडियन्स एका फिरकीपटूच्या शोधात आहे आणि ग्रीन त्यांचा शोध संपवू शकतो.

टॉम बँटन - इंग्लिश ट्वेंटी-20 ब्लास्टमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानी असलेला बँटन मुंबई इंडियन्सच्या फायद्याचा ठरू शकतो. एव्हीन लुईलसा रिलीज केल्यानंतर त्याच्या जागी बँटन या सक्षम पर्याय ठरू शकतो.