IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही भीतीचं वातावरण?; CSKविरुद्ध दोन दिवसांपूर्वी झालेला सामना

इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2021) बायो बबल अखेर कोरोनानं भेदला अन् फ्रँचायझींच्या खेळाडूंसह अनेक सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंना कोरोना झाल्याची बातमी समोर आली, अन् क्रिकेट वर्तुळात एकच गोंधळ उडाला. ऑस्ट्रेलियाचा व KKRचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याचीही प्रकृती ठिक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे KKR vs RCB असा आज होणारा सामना स्थगित करावा लागला आहे.

या धक्क्यातून सावरतोय तोच चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यात CSKचे CEO काशी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचा समावेश आहे.

यापैकी बालाजी CSKच्या खेळाडूंच्या संपर्कात आला होता. पण, सुदैवानं आतापर्यंत CSKच्या एकाही खेळाडूला कोरोना झाला नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चेन्नईच्या सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही चिंतेचे वातावरण आहे.

दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता आणि त्यावेळी MIचे खेळाडू लक्ष्मीपती बालाजीच्या संपर्कात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या कोरोना रिपोर्टची सर्वांना प्रतीक्षा आहे.

CSKच्या 4 बाद 218 धावांच्या डोंगरासमोर MIचा टिकाव लागणार नाही, असेच वाटत होते. फॅफ ड्यू प्लेसिस ( 50), मोईन अली ( 58) व अंबाती रायुडू ( 72) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं 20 षटकांत 4 बाद 218 धावांचा डोंगर उभा केला.

क्विंटन डी कॉक ( 38) व रोहित शर्मा ( 35) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही मुंबई जिंकेल असे वाटत नव्हते. पण, कृणाल पांड्या व पोलार्ड यांनी दमदार भागीदारी केली. कृणाल 32 धावांवर बाद झाला. पोलार्डनं 34 चेंडूंत 6 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 87 धावा करताना MIचा विजय पक्का केला.

दरम्यान, पूर्वीचा फिरोज शाह कोटला स्टेडियम ( आता अरुण जेटली स्टेडियम) मधील ५ कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे, कालच पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत कोटलावर खेळवण्यात आली. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्येही चिंतेचे वातावरण आहे.