IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?

IPL 2021, RR vs DC, Playing 11: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) वि. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) अशी लढत होणार आहे. काय असेल आजच्या सामन्याचं गणित जाणून घेऊयात...

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समधील आयपीएलच्या आजवरच्या लढती पाहिल्या तर दोन्ही संघ अगदी बरोबरीत आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत ११ वेळा विजय प्राप्त केला आहे.

विशेष म्हणजे, यंदा दोन्ही संघांचं नेतृत्व भारताच्या युवा क्रिकेटपटूंच्या खांद्यावर सोपविण्यात आलं आहे. रिषभ पंत आणि संजू सॅमसन दोघंही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून उदयाला आले आहेत. दोघंही सध्या तुफान फॉर्मात आहेत.

दिल्ली विरुद्ध राजस्थान अशी जरी आजची लढत असली तरी रिषभ पंत वि. संजू सॅमसन याच दृष्टीकोनातून आजच्या सामन्याकडे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे आजचा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

दोन्ही संघ आपले सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरविण्याचा प्रयत्न करतील. पण असं असलं तरी दोन्ही संघांमधील मातब्बर खेळाडू आजच्या सामन्यात बाहेर राहणार आहेत. यामागचं कारण आहे कोरोना आणि दुखापत.

राजस्थान रॉयल्स संघाला दुखापतीचं तर दिल्ली कॅपिटल्स संघाला कोरोनाचं ग्रहण लागलं आहे. कोरोनामुळे दिल्लीचे तीन खेळाडू आजचा सामना खेळू शकणार नाहीत. तर राजस्थानचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर असणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असणारे कगिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्खिया तर भारतीय फिरकीपटू अक्षय पटेल कोरोनामुळे क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजीची धार बोथट झाली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला तर मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याआधीच दुखापतीमुळे बाहेर असताना आता अष्टपैलू बेन स्टोक्स देखील गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. बेन स्टोक्सला झालेली दुखापत गंभीर असून तो आयपीएल स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे.

राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनं दुखापतीवर मात करुन पुन्हा ट्रेनिंगला सुरुवात केली असली तरी आजच्या सामन्यासाठी तो फिट नसल्याचं सांगितलं जात आहे.

नॉर्खिया आणि रबाडा तर दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीचे मुख्य गोलंदाज आहेत. दोघंही सामन्यात नसणं म्हणजे दिल्लीला याचा मोठा फटका बसू शकतो.

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन, लियाम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर, ख्रिस वोक्स, आर.अश्विन, टॉम करन, अमित मिश्रा, आवेश खान