IPL 2021 : पाय मुरगळला, तरीही रोहित शर्मानं सोडलं नाही मैदान; MIच्या कॅप्टननं कमावला मान!

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्यानं त्यांचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला.

सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKR साठी नितीश राणा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. हा सामना कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते. पण, राहुल चहरनं चार विकेट्स घेत सामनाच फिरवला. नितीशनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या, राहुल चहरनं २७ धावांत चार विकेट्स घेतल्या.

कोलकाताला विजयासाठी अखेरच्या ३६ चेंडूंत ४० धावांची गरज होती. पण, मुंबईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना संघाला १० धावांनी विजय मिळवून दिला. कृणालनं १३ धावांत १, ट्रेंट बोल्टनं २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. बुमराहनं २८ धावा दिल्या.

या सामन्यात रोहित शर्मानंही १ षटक फेकलं. १४व्या षटकाचा पहिलाच चेंडू टाकताना रोहित शर्माचा पाय मुरगळला होता. त्यानंतर रोहित मैदानावरच बसला. वेदनेनं विव्हळत असलेल्या रोहितसाठी MIची वैद्यकिय टीम धावून आली. MIच्या चाहत्यांमध्ये टेंशन वाढत होतं. पण, रोहितनं प्राथमिक उपचार घेत ते षटक पूर्ण केलं. त्यानं ९ धावा दिल्या.

त्यानंतरही रोहित संघाला अडचणीत सोडून मैदानाबाहेर गेला नाही, तर अखेरपर्यंत खेळाडूंना मार्गदर्शन करत राहिला आणि आक्रमक क्षेत्ररक्षण लावून KKRच्या फलंदाजांवर दडपण टाकले. त्यामुळेच KKRला सोपा विजय मिळवता आला नाही.