IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

IPL 2021, Sanju Samson: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातला चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होतोय. राजस्थाननं यंदा संघात मोठे बदल केलेत. नवनिर्वाचित कर्णधार संजू सॅमसननं यंदाचा संपूर्ण प्लान सांगितलाय वाचा...

राजस्थान रॉयल्स संघानं यंदा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला करारमुक्त करुन संघाची धुरा भारताचा युवा फलंदाज संजु सॅमसन याच्याकडे दिली आहे.

संघाचा कर्णधार बदलण्यासोबतच राजस्थानच्या संघाचा संचालक म्हणून श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याची नियुक्ती करण्यात आलीय.

संजू सॅमसन यानं यंदाच्या आयपीएल कशी जिंकायची आणि त्यासाठी काय करावं लागेल यासाठीचा त्याच्या डोक्यातील प्लान समजावून सांगितला आहे.

राजस्थानच्या संघात जसे नवे बदल केले जातायत तसे बदल आता संघातील इतर खेळाडूंना संधी देण्याबाबतीतही करण्याचा विचार असल्याचं सॅमसननं सांगितलं.

आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली. अगदी पहिलंच पर्व राजस्थानने आपल्या कामगिरीने गाजवलं. पहिल्या पर्वाचं जेतेपद राजस्थानने मिळवलं. मात्र त्यानंतर राजस्थानला चमकदार कामगिरी करता आली नाही.

आयपीएलसारख्या कठीण स्पर्धेमध्ये संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरायला हवा. कारण संघात अनेक पर्याय आहेत. पर्यायी खेळाडूंना संधी मिळायली हवी, असं संजू सॅमसन म्हणाला.

संगकारासोबत संपूर्ण प्लानबाबत चर्चा सुरू असून संघात सर्वोत्तम कॉम्बिनेशन देणं हेच उद्दीष्ट आहे. संघाला स्थिरता देण्याचा प्रयत्न असेल, असंही संजूनं सांगितलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये आमचा संघ पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत खेळताना पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये आक्रमकता ही स्पर्धेची गरज आहे. त्यानुसार संघात महत्वाचे बदल पाहायला मिळतील, असं संजूनं सांगितलं आहे.

सलामीजोडी कोण असेल हे जरी अद्याप ठरलेलं नसलं तरी सामन्यात सलामीजोडीनं आक्रमक खेळ करणं गरजेचं आहेच पण जम बसविण्यासाठी वेळही देणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यानुसारच आम्ही संपूर्ण स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून योजना आखत आहोत, असं संजू म्हणाला.

रॉबिन उथप्पा, स्टीव्ह स्मिथ यांना करारमुक्त केल्यामुळे राजस्थान रॉयल्सकडे आता संघाच्या सलामीजोडीसाठी जोस बटलर, बेन स्टोक्स, यशस्वी जयस्वाल आणि स्वत: कर्णधार संजू सॅमसन हेच पर्याय शिल्लक राहिले आहेत.