२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार?

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) लढत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) सोबत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघात आज बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काय होऊ शकतो बदल...

सनरायझर्स हैदराबाद संघाची यंदाच्या सीझनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सुरुवातीच्या तिनही सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाला तीन पैकी केवळ एका सामन्यात विजय प्राप्त करता आला आहे. हैदराबादच्या संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

हैदराबादच्या संघासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे. त्यात गेल्या तीन सामन्यांमध्ये धीम्या गतीनं फलंदाजी केल्याचा ठपका मनिष पांडेवर असल्यानं संघात एक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मनिष पांडेकडून टी-२० ला साजेशी फलंदाजी होत नसल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे मनिष पांडे संघातील स्थान गमावू शकतो अशी दाट शक्यता आहे. मनिष पांडेच्या जागी हैदराबादकडून युवा भारतीय खेळाडूला संधी दिला जाऊ शकते.

मनीष पांडेनं तिनही सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. पण संघाच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या कारणांपैकी मनीष पांडेची धीम्या गतीची फलंदाजी हे देखील एक प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.

पंजाब किंग्ज विरुद्धच्या आजच्या सामन्यात मनिष पांडेला जर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाच तर संघात २० वर्षीय प्रियम गर्ग याला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रियम गर्गनं गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

यूएईमध्ये झालेल्या गेल्या आयपीएलमध्ये प्रियम गर्ग एकूण १४ सामने खेळला होता. यात त्यानं १२० च्या स्ट्राइक रेटनं १३३ धावा केल्या होत्या. यात त्याची सर्वाधिक नाबाद ५१ धावांची वैयक्तिक खेळीचा समावेश आहे.

प्रियम गर्ग यानं तडफदार फलंदाजीनं काही सामन्यांमध्ये संघाला संकटातून वाचवलं देखील होतं. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

हैदराबादला आजच्या सामन्यातही निराशा पदरी पडली तर आयपीएलच्या प्ले-ऑफसाठीचा मार्ग आणखी खडतर होईल. त्यामुळे वॉर्नर आज मनिष पांडेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवणार की नव्या खेळाडूला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.