८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा

IPL 2021 साठी स्पर्धेतील सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि संघात काही मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हणाला गंभीर? जाणून घेऊयात...

IPL 2021 साठी या स्पर्धेतील जवळपास सर्वच संघ आपली संघ बांधणी करत आहेत. यात अनेक खेळाडूंना संघ मालकांनी करारमुक्त करुन धक्का देखील दिला आहे. येत्या एप्रिल महिन्यात आयपीएलचा पुढील मोसम भारतात आयोजित केला जाणार आहे.

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने याच पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्यावर जोरदार टीका केली आहे. "गेल्या आठ वर्षांपासून बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. मला एकातरी खेळाडूचं नाव सांगा की ज्यानं ८ वर्षांपासून एकही विजेतेपद पटकावलेलं नाही", असं गंभीर म्हणाला.

"रॉयल चॅलेंजर्स बंगलुरीच्या अपयशासाठी कर्णधारालाच जबाबदार धरायला हवं. मला कोहली विरोधात काही बोलायचं नाही. पण त्यानं स्वत:हून पुढं येऊन जबाबदारी स्वीकारायला हवी", असंही गंभीर म्हणाला.

IPL 2021 च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. याआधी प्रत्येक संघ आपल्याकडील राखीव आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरू संघानं नुकतेच आपल्या संघातून १० खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यात ख्रिस मोरिस, अॅरोन फिंच, इसरु उडाना, डेल स्टेन, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरतसिंह मान आणि पार्थिव पटेल यांचा समावेश आहे.

बंगळुरू संघानं आपल्या संघातून तब्बल १० खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं संघावर जोरदार टीका केली.

"दरवर्षी संघात मोठे बदल करणं हीच बंगळुरू संघाची मोठी समस्य आहे. यामुळे संघात समतोल राखता येत नाही आणि खेळाडूंमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होते", असं गंभीर म्हणाला.

"संघातून फक्त १० खेळाडूंना करारमुक्त करणं हा इतकाच प्रश्न नाही. त्यांना आणखी एका वर्षानंतर वाईट खेळीमुळेही करारमुक्त केलं जाऊ शकलं असतं. खरंतर प्रशिक्षक आणि सल्लागारांची ही चूक आहे", असंही तो पुढे म्हणाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं ख्रिस मॉरिसला करारमुक्त केल्याच्या निर्णयावर गंभीरने आश्चर्य व्यक्त केलं.

"ख्रिस मॉरिसवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास दाखवत होता आणि त्याच खेळाडूला तुम्ही आज करारमुक्त केलं. गेल्या मोसमात पाहायचं झालं तर मॉरिसने चांगली कामगिरी केली होती. हीच गोष्ट उमेश यादवच्या बाबतीतही लागू होते", असं गंभीर म्हणाला.