IPL 2021साठी पाच खेळाडूंनी दाखवला पाकिस्तानला 'ठेंगा'; मालिका मध्येच सोडून भारतात दाखल!

पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका मध्येच सोडून दक्षिण आफ्रिकेचे पाच खेळाडू आयपीएल २०२१साठी भारतात दाखल झाले आहेत. Five South African Players left ODI Series Against Pakistan for IPL 2021

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारीही केली आहे. खेळाडूही मैदानावर कसून सराव करताना दिसत आहेत.

राष्ट्रीय कर्तव्यावर असल्यामुळे काही खेळाडू आयपीएल फ्रँचायझींसोबत सुरुवातीपासून सहभागी झाले नव्हते. याच कालावधीत एक मोठी बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका मध्येच सोडून दक्षिण आफ्रिकेचे पाच खेळाडू आयपीएल २०२१साठी भारतात दाखल झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्ट्जे आणि कागिसो रबाडा हे आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी भारतात आले आहेत.

पाकिस्तानचा संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेतील दोन सामने झाले असून पाकिस्ताननं पहिला सामना जिंकला, तर आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात कमबॅक करताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले की,''आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता यावं यासाठी बीसीसीआयसोबत काही सामंजस्य करार केले आहेत. त्यानुसारच आम्ही आयपीएल २०२१पासून खेळाडूंना रोखू शकत नाही. या पाच खेळाडूंना भारतात जाऊन आयपीएलमध्ये खेळावे लागेल. आयपीएलमध्ये खेळून त्यांना आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारीही करता येईल. त्यांना भारतीय खेळपट्टीचा चांगला अभ्यास करता येईल.''

क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स)प्रमाणे कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्टजे ( दोघंही दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) यांचाही वन डे मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात समावेश केला गेला आहे. पण, दुसऱ्या वन डे सामन्यानंतर ते भारतात येण्यासाठी रवाना झाले.

हे खेळाडू एका बायो बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये येत आलेत त्यामुळे त्यांना ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे ते सुरुवातीचे १-२ सामने मुकणार आहेत.