IPL 2021, DC vs MI : रोहित शर्माला एक न्याय अन् लोकेश राहुलवर अन्याय; इरफान पठाण संतापला, नवा वाद छेडला!

IPL 2021 : आयपीएल म्हटलं की मनोरंजनासह तिथे वाद हे यायलाच हवेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) यानं आयपीएलमध्ये कशी दुटप्पी वागणुक दिली जाते, याचे उदाहरण दिले आहे.

प्रथम फंलदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( २४), इशान किशन ( २६) व जयंत यादव ( २३) यांनी सुरेख खेळ केला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून माघारी परतले.

अमित मिश्रानं अनुभव पणाला लावताना मुंबईच्या फलंदाजांना नाचवले. त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. MIविरुद्ध DCच्या गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आवेश खाननं २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीनं १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.

आयपीएलच्या सामन्यात दव फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अशात MI vs DC सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या विनंती वरून १३व्या षटकात चेंडू बदलण्यात आला.

यावेळी समालोचन करणाऱ्या इरफान पठाणननं जराही विलंब न लावता आयपीएलमध्ये दुजाभाव होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. आज जशी रोहितची विनंती मान्य केली गेली, तशी विनंती अन्य संघाची मान्य झालेली नाही.

इरफान पठाणनं उपस्थित केलेल्या मुद्यावर निखिल चोप्रा यानंही सहमती दर्शवली. सर्व संघांसाठी एकच नियम असायला हवेत, अशी प्रतिक्रिया दिली.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सलाही सुका चेंडू देण्यात आला होता. पण, त्यावेळी चेंडू सीमापार गेल्यानं हरवला होता, म्हणून दुसरा चेंडू दिला गेला होता. त्यानंतर CSKनं सामनाच फिरवला.

पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अम्पायरकडे चेंडू बदलण्याची विनंती वारंवार केली, परंतु नियमाकडे बोट दाखवून ती अमान्य केली गेली.