IPL 2021: आयपीएलचे सर्व सामने फक्त 'या' दोन शहरांत होणार? बीसीसीआयची मोठी तयारी

'बीसीसीआय'साठी (BCCI) बक्कळ उत्पन्न मिळवून देणाऱ्या आयपीएल स्पर्धेवरही (IPL 2021) आता कोरोनाचं (Covid 19) सावट वाढत चाललं आहे. खेळाडूंचा लिलाव पार पडलाय. तर स्पर्धेसाठीची जवळपास संपूर्ण तयारी बीसीसीआयनं केली आहे. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सामन्यांसंदर्भात बीसीसीआयकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात...

आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठी बीसीसीआयनं तयारीला सुरुवात केलीय. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची स्पर्धा संपूर्ण देशभर न घेता काही ठराविक स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.

आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमध्येच खेळविण्याची तयारी बीसीसीआयनं केल्याचं बोललं जात आहे. यात मुंबईतील चार स्टेडियम, तर अहमदाबादमधील नवंकोरं मोटेरा स्टेडियमचा समावेश असणार आहे.

आयपीएलचे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन मुंबईत होण्याची शक्यता असून यासाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील आणि रिलायन्स क्रिकेट स्टेडियमचा विचार केला जात आहे.

आयपीएलचे लीग स्टेजमधील सामने आणि अंतिम सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे.

भारतीय संघ सध्या अहमदाबादच्या याच मोटेरा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमम्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे याच स्टेडियमवर आयपीएलचे अंतिम फेरीतील सामने खेळविण्याची तयारी बीसीसीआयनं केल्याचं म्हटलं जात आहे.

आएएनएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईत सध्या चार क्रिकेट स्टेडियम आहेत. त्यावर साखळी फेरीतील सामने खेळविण्याचा विचार सुरू आहे. यात ब्रेबॉन, वानखेडे, डी.वाय.पाटील आणि रिलायन्स स्टेडियमचा समावेश आहे. तर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्याचा मानस आहे"

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविले गेले आहेत. याआधी २०११ साली याच स्टेडियमवर भारताने विश्वचषक देखील जिंकला आहे. पण ब्रेबॉन स्टेडियमवर याआधी २०१८ साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. तर रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर आजवर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही.

डी.वाय.पाटील स्टेडियमवरही एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकलेला नाही. याआधी २००९ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा आंतरराष्ट्रीय सामना या स्टेडियमवर होणार होता. पण पावसामुळे तो रद्द झाला होता. दरम्यान या स्टेडियमवर २०१० साली आयपीएलच्या सामन्यांचं आजोजन झालं आहे. तर २०१७ मध्ये अंडर-१९ फुटबॉल विश्वचषकाचेही सामने या स्टेडियमवर झाले आहेत.

जिओ क्रिकेट स्टेडियम म्हणजे रिलायन्स फाऊंडेशनच्या स्टेडियमवर आजवर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही. दरम्यान, या स्टेडियमवर दोन रणजी क्रिकेट सामने झाले आहेत. तर तब्बल ५ वेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचं हे ट्रेनिंग ग्राऊंड आहे. मुंबई इंडियन्सचा संघ याच स्टेडियमवर सराव करतो.