JIO ग्राहकांना मोठा धक्का; IPL 2020चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करावी लागेल 'ही' गोष्ट!

आयपीएलच्या 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे.

खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे सर्व 8 संघांसाठीच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून आयपीएलचा थरार पाहण्यासाठी उत्सुक असलेले क्रिकेट चाहतेही आनंदीत आहेत. पण, आजची बातमी कदाचित त्यापैकी अनेकांना धक्का देणारी ठरेल.

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या लीगमध्ये 10 डबल हेडर सामने ( 3.30 वाजता होतील सामने) खेळवण्यात येतील. दरम्यान, महिला ट्वेंटी-20 चॅलेंज होणार असून तीन संघांमध्ये चार सामने खेळवण्यात येणार आहेत.

स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहेत. शिवाय हॉटस्टार या अॅपवर आयपीएलचे सामने पाहता येतात.

ज्यांच्याकडे हॉटस्टार सबक्रीप्शन नाही, त्यांच्याकडे आयपीएल सामने पाहण्यासाठी JIO Tv अॅपचा पर्याय होता. पण, आता त्या लाखो जिओ ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे.

जिओला आता आयपीएलच्या 13व्या मोसमाचे थेट प्रक्षेपण करता येणार नाही. हॉटस्टार आणि JIO Tv यांच्यात थेट प्रक्षेपणाच्या हक्कावरून सुरू असलेल्या डीलमधून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जिओनं माघार घेतली आहे.

e4Mने दिलेल्या वृत्तानुसार हॉटस्टार आणि जिओ टिव्ही यांच्यात आयपीएल प्रक्षेपणावरून कोणताही करार झाला नाही आणि त्यामुळे जिओनं माघार घेतली.

''आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणावरून जिओ टिव्ही आणि हॉटस्टार यांच्यात मार्च महिन्यात वाटाघाटी झाली होती, परंतु त्यांच्यात करार झाला नव्हता. आता ही डील संपुष्टात आल्यात जमा आहे. पण, अखेरच्या क्षणाला काही होऊ शकतं,''असं तज्ज्ञांनी सांगितलं.

2019च्या आयपीएलने हॉटस्टारला जवळपास 300 मिलियन व्ह्यूअर्स दिले. 2018च्या तुलनेत हा आकडा 74 टक्क्यांनी वाढला. शिवाय चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला अंतिम सामना 18.6 मिलियन लोकांनी पाहिला.

यंदा हे सर्व विक्रम मोडले जातील, अशी हॉटस्टारला अपेक्षा आहे. हॉटस्टारवर 5 मिनिटांच्या प्रक्षेपणानंतर ग्राहकांना सबक्रीप्शन घ्यावं लागत होतं, परंतु जिओ टिव्ही त्यांच्या ग्राहकांना मोफत आयपीएल सामने दाखवणार होते. आता जिओनं माघार घेतल्यानं क्रिकेट चाहत्यांना हॉटस्टारचं सबक्रिप्शन घ्यावं लागण्याची शक्यता आहे.

Read in English