IPL 2020 पाहण्यापूर्वी यंदाच्या पर्वातील 10 नव्या गोष्टी नक्की जाणून घ्या!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

देशातील कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण लक्षात घेता IPL 2020 संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजाह येथे IPL 2020चे सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतरच खेळाडूंना एकमेकांना भेटता आले आहे. प्रत्येक संघाला बायो-सुरक्षा नियमांचे पालन करावेच लागत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली जाणार नाही. प्रथमच IPL 2020चे सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येत आहेत.

आयपीएलच्या सामन्यांची वेळही बदलण्यात आली आहे. 2019च्या IPLमध्ये रात्रीचे सामने 8 वाजता खेळवण्यात आले होते, परंतु यंदा 7.30 वाजता रात्रीचे सामने होतील, तर दुपारच्या सामन्यांना 3.30 वाजल्यापासून सुरुवात होईल.

प्रत्येक संघाला बायो-बबलमध्ये रहावे लागत आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये रहावे लागले होते. तसाच प्रयोग आयपीएलमध्येही होत आहे.

कोरोना व्हायरसची भीती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यास सर्व फ्रँचायझींना सांगण्यात आले आहे. खेळाडू व सपोर्ट स्टाफची नियमित तपासणी केली जात आहे. BCCI लीगदरम्यान 22 हजार चाचण्यांसाठी 10 कोटी खर्च करणार आहे.

मार्च-एप्रिलमध्ये होणारी आयपीएल यंदा सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येत आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या 53 दिवसांत ही लीग पार पाडण्यात येणार आहे. त्यात 10 डबल हेडर सामने असतील.

भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता यंदा चिनी कंपनी VIVOनं टायटल स्पॉन्सरवरून आपलं नाव मागे घेतलं. Dream11 यंदाचे टायटल स्पॉन्सर आहेत.

IPL 2020साठी Unacademy हे नवीन ऑफिशियल पार्टनर असणार आहेत. पुढील तीन पर्वांसाठी Unacademy नं हक्क मिळवले आहेत.

प्रत्येक संघानं नवीन स्पॉन्सर्स मिळवल्यानं त्यांची जर्सीही नवीन दिसणार आहे. Chennai Super Kings, Mumbai Indians, Royal Challengers Bangalore, Kolkata Knight Riders, Delhi Capitals, Rajasthan Royals, Sunrisers Hyderabad, KingsXI Punjab हे संघ नव्या जर्सीत दिसतील.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) चेंडू चमकावण्यासाठी लाळ/थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. तोच नियम IPL 2020मध्ये दिसेल.