WTC final squad : ४ सलामीवीर, ९ जलदगती गोलंदाज अन् २-३ यष्टिरक्षक; BCCI निवडणार टीम इंडियाचा जम्बो संघ!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी आज टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ( Indian squad for the World Test Championship (WTC) final, against New Zealand).

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी आज टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ( Indian squad for the World Test Championship (WTC) final, against New Zealand). बीसीसीआय आणि निवड समिती न्यूझीलंडविरूध्दच्या या फायनलसाठी जम्बो संघ निवडण्याच्या तयारीत आहेत.

या जम्बो संघात चार सलामीवीर, ४-५ मधल्या फळीतील फलंदाज, ४-५ फिरकीपटू, ८-९ जलदगती गोलंदाज अन् २-३ यष्टिरक्षक असण्याची शक्यता आहे, असा दावा Cricbuzz ने केला आहे. १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथे हा सामना होणार आहे.

या जम्बो संघाचा पक्का आकडा हा बीसीसीआयची सल्लागार समितीच देऊ शकते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे.

खेळाडूंची अधिक संख्या ही टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलच्या तयारीसाठीही फायद्याची ठरेल. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आंतर संघ सामने खेळवण्यात टीम इंडियाला मदत मिळेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटते.

भारतीय संघात फार काही बदल पाहायला मिळतील याची अपेक्षा कमीच आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघच कायम राखण्याचा अंदाज आहे.

हार्दिक पांड्याला संधी द्यायची की नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती.

फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ याचे पुनरागमन हाही चर्चेचा मुद्दा असेल. पण, WTC Final साठी शुबमन गिल, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे चार सलामीवीर पक्के आहेत. तरीही चार महिन्यांचा दौरा लक्षात घेता पृथ्वीला संधी मिळू शकते.

प्रसिद्ध व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर हे पर्याय आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका मुकलेला मोहम्मद शमीचे पुनरागमन होईल. आवेश खानच्या नावाचा विचार होऊ शकतो.

जलदगती गोलंदाजीत २५ वर्षीय प्रसिद्ध कृष्णाला लॉटरी लागू शकते. त्याला नवदीप सैनी टक्कर देण्यासाठी आहे, परंतु इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील प्रसिद्धच्या कामगिरीवर निवड समिती खूश आहे.

शमीप्रमाणे रवींद्र जडेजा व हनुमा विहारी यांचेही संघात पुनरागमन होणार आहे. दुखापतीमुळे ही दोघही इंग्लंडविरुद्धची मालिका खेळले नव्हते.

आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची जबाबदारी असेल. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मधली फळी सांभाळतील. वॉशिंग्टन सूंदर हाही संघाचा भाग असेल. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत व वृद्धिमान सहा यांच्यासह केएस भरत हा तिसरा पर्याय असू शकतो.