टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्यादरम्यान एक महिन्याचा कालावधी आहे आणि यादरम्यान भारतीय संघ आणखी एका दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. लंडनमध्ये १८ ते २२ जून या कालावधीत भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (ICC World Test Championship) फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्यादरम्यान एक महिन्याचा कालावधी आहे आणि यादरम्यान भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

इंग्लंड दौरा सोडून टीम इंडिया पुन्हा श्रीलंकेत येणार नाही, तर या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ बीसीसीआय पाठवणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याशिवाय मैदानावर उतरणार. अशात टीम इंडियाचे नेतृत्व कोण सांभाळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनं नुकतीच २० सदस्यीय संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात हनुमा विहारी, रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले. तर अक्षर पटेलनं स्थान कायम राखले. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना मात्र लंडन दौऱ्यासाठीच्या संघात स्थान पटकावता आले नाही.

PTIच्या वृत्तानुसार शिखर धवन, हार्दिक, भुवी, दीपक चहर, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव यांना आयपीएल रद्द झाल्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा पुरेसा सराव मिळणार नसल्यानं बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्याचं आयोजन केलं आहे. ( According to PTI - BCCI needs Dhawan, Hardik, Bhuvneshwar, Deepak Chahar, Yuzi Chahal, Suryakumar to get match ready as IPL is cancelled and T20 World Cup is coming up so they have decided to travel to Sri Lanka) . जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही मालिका सुरू होईल.

सलामीची जोडी - श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवन, पृथ्वी शॉ ही जोडी सलामीवीर म्हणून निवडली जाऊ शकते. त्यांच्यासोबत चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड व रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा देवदत्त पडीक्कल यांचीही निवड शक्य आहे.

मधली फळी - सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यावर ही जबाबदारी असेल. श्रेयस अय्यरनं फिटनेस टेस्ट पास केल्यास त्याचे संघातील स्थान पक्के होईल. हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, मनीष पांडे हे तगडे दावेदार आहेत.

फिरकीपटू - राहुल चहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल टेवाटिया, श्रेयस गोपाळ आणि रवि बिश्नोई अशी लांबलचक यादी बीसीसीआयसमोर पर्याय म्हणून आहे.

जलदगती गोलंदाज - भुवनेश्वर कुमारवर जलदगती गोलंदाजाचे नेतृत्व असेल. त्याच्यासोबत दीपक चहर, नवदीप सैनी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, कमलेश नागरकोटी, इशान पोरेल व शिवम मावी ही युवा फौज आहे.