Record Breaking : भारताच्या पहिल्या डावाचे हायलाइट्स एका क्लिकवर!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले.

या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला.

रोहितनं आणखी एका विक्रमाची भर घातली. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला.

कसोटीत षटकार खेचून द्विशतक साजरा करणारा रोहित हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला असावा. शिवाय एकाच कसोटीत शतक व द्विशतक पूर्ण करण्यासाठी षटकार खेचणाराही तो पहिलाच खेळाडू आहे. रोहित द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर करेल असे वाटले होते, परंतु कागिसो रबाडानं त्याची ही घोडदौड थांबवली. रोहित 255 चेंडूंत 28 चौकार व 6 षटकार खेचून 212 धावांत माघारी परतला.

कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक असले तरी हे त्याचे पाचवे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील द्विशतक ठरले. त्यानं 2009मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करताना गुजरातविरुद्ध नाबाद 309 धावा चोपल्या होत्या. 2006 साली गुजरातविरुद्ध 205, 2012 साली पंजाबविरुद्ध 203 आणि 2010मध्ये बंगालविरुद्ध 200* अशी त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील द्विशतकं आहेत.

रोहितचा तो षटकार हा कसोटी क्रिकेटमधील त्याचा पन्नासावा षटकार ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांत वीरेंद्र सेहवाग ( 91) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( 78), सचिन तेंडुलकर ( 69), कपिल देव ( 69), सौरव गांगुली ( 57) आणि रोहित शर्मा ( 51) यांचा क्रमांक येतो.

रोहितनं या द्विशतकासह Fantastic Four दिग्गजांमध्ये स्वतःच नाव समाविष्ठ केलं आहे. वन डे आणि कसोटीत द्विशतक झळकावणारा रोहित चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत.

अजिंक्यने 11 वे कसोटी शतक झळकावले. अजिंक्यनं 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.

चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक 200+ भागीदारी करणाऱ्या फलंदाजांत अजिंक्यनं महान फलंदाज तेंडुलकरशी बरोबरी केली आहे. अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी 5व्यांदा 200+ धावांची भागीदारी केली. तेंडुलकरच्या नावावर 5वेळा 200+ धावांची भागीदारी आहे. त्यानंतर सौरव गांगुली ( 3), विराट कोहली ( 3), व्हीव्हीएस लक्ष्मण ( 2) यांचा क्रमांक येतो.

रोहितनं कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावाची नोंद केली. त्यानं या कसोटीत 500+ धावा करण्याचा विक्रमही केला. एका कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा तो पाचवा भारतीय सलामीवीर ठरला, परंतु वीरेंद्र सेहवाग आणि रोहित यांच्या खेळीत साम्य राहिले. एकाच कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा रोहित भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. यापूर्वी विनू मांकड, बुधी कुंदरन, सुनील गावस्कर ( 5), वीरेंद्र सेहवाग यांनी अशी कामगिरी केली आहे. पण, सेहवागनंतर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 500+ धावा करणारा रोहित हा पहिलाच सलामीवीर ठरला.

रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.

भारताकडून चौथ्या विकेटसाठीही ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. परंतु, संघाची अवस्था 3 बाद 40 किंवा त्याहून बिकट असताना चौथ्या विकेटने केलेली ही जगभरातली सहावी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विशेष म्हणजे अव्वल पाचमध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक तीन वेळा 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितनं वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी केली आहे. शिवाय एकाच कसोटी मालिकेत दोन वेळा 150+ धावा करणारा रोहित पाचवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. विनू मांकड ( वि. न्यूझीलंड, 1955/56), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, 1978/79), सुनील गावस्कर ( वि. ऑस्ट्रेलिया, 1985/86), वीरेंद्र सेहवाग ( वि. पाकिस्तान, 2004/05), मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, 2012/13) यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. या शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच मालिकेत 150+ धावा दोन वेळा करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे.

एकाच सामन्यात मुंबईच्या दोन फलंदाजांना शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007मध्ये वसीम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेशविरुद्ध ढाका कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा मान रोहित व अजिंक्यने पटकावला. अजिंक्यनं गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ अडचणीत असताना शतक झळकावले आहे. गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची अवस्था 3 बाद 25 अशी होती आणि तेव्हाही अजिंक्यनं शतक ठोकले होते.

उमेशनं 10 चेंडूंत 5 षटकार खेचून 31 धावा चोपल्या. त्यानं 310 च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 10+ चेंडूंचा सामना करून सर्वोत्तम स्ट्राईक रेट राखण्याचा पराक्रम उमेशनं केला. शिवाय त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचणारा उमेश तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1948मध्ये फॉली विलियम्स यांनी इंग्लंडविरुद्ध, तर सचिन तेंडुलकरने 2013साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचले होते.