शिखर, हार्दिक, भुवनेश्वर परतणार; असे असणार टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन वन डे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. या मालिकेतून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत.

या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता होती. पण, संघ व्यवस्थापनाने त्याला संघात कायम राखले आहे. न्यूझीलंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा अजूनही तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनसह सलामीसाठी पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे दोन पर्याय आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वी आणि मयांक अग्रवाल यांनी ओपनिंग केली होती. पृथ्वीला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण, तरीही आफ्रिकेविरुद्ध धवन आणि पृथ्वी ही जोडी सलामीला येईल.

मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे पर्याय आहेत. कर्णधार म्हणून विराटचे स्थान पक्के आहे आणि लोकेशचा फॉर्म पाहता त्याला बाहेर बसवण्याची शक्यता फार कमी आहे.

अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. श्रेयसची न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याचेच पारडे जड मानले जात आहे.

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा असे दोन अष्टपैलू पर्याय संघासमोर आहेत. हार्दिकने नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-20 स्पर्धेत तुफानी फटकेबाजी करून दमदार पुनरागमनाचे संकेत दिले.

रवींद्र जडेजालाही या सामन्यात संधी मिळू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीला धार मिळेल. जडेजा गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे.

भारतीय संघ या सामन्यात दोन फिरकीपटूंसह उतरू शकतो. जडेजाला साथ म्हणून युजवेंद्र चहलचा समावेश निश्चित आहे.

जलदगती गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल

भारतीय संघ- शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह