IND Vs SL 2nd ODI Live : राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:54 PM2021-07-20T23:54:07+5:302021-07-21T08:47:08+5:30

IND vs SL 2nd ODI Int Live Score : भारतीय संघ दुसरा वन डे सामना जिंकेल, असे खरंच वाटले नव्हते. विजयासाठी जवळपास ८४-८५ धावा आवश्यक असताना ७ फलंदाज माघारी परतले होते. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाज खेळपट्टीवर असल्यानं श्रीलंकेच्या मनात विजयाच्या उकळ्या फुटल्या होत्या. पण, घडले भलतेच...

IND vs SL 2nd ODI Int Live Score : भारतीय संघ दुसरा वन डे सामना जिंकेल, असे खरंच वाटले नव्हते. विजयासाठी जवळपास ८४-८५ धावा आवश्यक असताना ७ फलंदाज माघारी परतले होते. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाज खेळपट्टीवर असल्यानं श्रीलंकेच्या मनात विजयाच्या उकळ्या फुटल्या होत्या. पण, घडले भलतेच...

सूर्यकुमार यादवनं वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् श्रीलंकेचा संघ निर्धास्त होऊन, विजय आपलाच असा बागडू लागला. पण, दीपक चहरनं त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवला.

त्यानं वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह संघर्ष केला. प्रचंड दडपणातही चहरनं अफलातून खेळी केली. ४७व्या षटकात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले, तरीही त्यानं संघर्ष केला. ७ बाद १९३ वरून दीपक-भुवीनं सामना खेचून आणला. या दोघांमुळे श्रीलंकेच्या ताफ्यात 'कभी खूशी, कभी गम' असे वातावरण झाले.

अविष्का फर्नांडो ( ५०) आणि मिनोद भानूका ( ३६) यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. धनंजया डी सिल्व्हा ( ३२), चरिथ असलंका ( ६५) आणि चमिका करुणारत्ने ( ४४*) यांनी श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

मनिष पांडे व सूर्यकुमार यादव यांनी झटपट खेळी करताना धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मनिष चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु दुर्दैवीरितीनं त्याला माघारी जावं लागलं. मनिष ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ धावांवर बाद झाला. पण, पुढच्याच षटकात हार्दिक झेलबाद झाला.

सूर्यकुमारनं अर्धशतक पूर्ण करत टीम इंडियाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या, परंतु लक्षण संदकन यानं त्याला पायचीत पकडले. सूर्या ४४ चेंडूंत ६ चौकारांसह ५३ धावांवर बाद झाला. कृणाल पांड्याकडून अखेरच्या होप्स होत्या, परंतु हसरंगानं त्याला पायचीत केले. कृणाल ३५ धावांवर बाद झाला अन् टीम इंडियाच्या पुनरागमनाच्या आशाही मावळल्या होत्या.

भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांनी श्रीलंकेच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण केलं. चहर सुसाट सुटला, प्रचंड आत्मविश्वासानं तो श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यानं ६६ चेंडूंत वन डेतील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. वन डे क्रिकेटमध्ये ८ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करून अर्धशतक झळकावणारा चहर हा भारताचा ११वा खेळाडू ठरला.

दीपकनं ८२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. भुवीनं नाबाद १९ धावा करून त्याच्यासह ८व्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. भारतानं ३ विकेट्सनं हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

वन डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेला सर्वाधिक ९३वेळा पराभूत करण्याचा विक्रम भारतीय संघानं आज केला आणि त्यांनी पाकिस्तानचा विक्रम मोडाल. भारताकडून ८व्या विकेटसाठी दीपक व भुवीनं जोडलेल्या ८४ धावा ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०१७मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि भुवी यांनी श्रीलंकेविरुद्ध १००* धावांची भागीदारी केली होती.

वन डे क्रिकेटमध्ये भारताचा श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाठलाग करताना हा सलग १२ वा विजय ठरला. या सामन्यात राहुल द्रविडनं ४४व्या षटकात राहुल चहरकडे एक सिक्रेट मॅसेज पाठवला.

ड्रेसिंग रुममध्ये बसलेला द्रविड डगआऊटमध्ये आला अन् राहुलकडे दीपकसाठी एक मॅसेज दिला. त्यानंतर दीपकनं संयमी खेळी केली अन् भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. द्रविडनं मॅसेज पाठवला की सर्व चेंडू खेळून काढ आणि त्यानं तेचं केलं. (Deepak Chahar said Rahul Dravid told him to play all balls, he has the belief in Chahar and told him he's good enough to bat at 7.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!