India vs England : विराट कोहली आज विक्रमांचा रतीब घालणार; पाहा कसा!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आजच्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत अनेक विक्रम करण्याची संधी आहे. आजच्या लढतीत त्याला ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी करण्याची, तर रोहुल द्रविडला मागे टाकण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 18 धावा करणाऱ्या कोहलीनं त्यानंतर चार सामन्यांत सलग अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याला आतापर्यंत एकाही अर्धशतकी खेळीचं शतकात रुपांतर करता आलेले नाही.

कोहली व्यतिरिक्त यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन यांनी सलग चार अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

त्यामुळे आज कोहलीनं आणखी 50+ धावा केल्यास वर्ल्ड कप स्पर्धेत सलग पाच अर्धशतकी खेळी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आघाडीवर आहे. स्मिथने 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत हा पराक्रम केला होता.

पण, वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच कर्णधार ठरेल. सध्या त्याने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( 1992 वर्ल्ड कप) याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

शिवाय 50+ धावा केल्यास कोहली इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. राहुल द्रविड 1238 धावांसह आघाडीवर आहे. कोहलीच्या नावावर 27 डावांत 1189 धावा आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला 97 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर ( 2278) आणि सौरव गांगुली ( 1006) यांच्यानंतर तो अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरेल.