भावा एकच नंबर! रिषभनं कसोटीत दिला टी-२० चा आनंद; चाहते खूष!

India vs England, Rishabh Pant Centuay: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) खणखणीत शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिषभच्या तडफदार खेळीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे

रोहित शर्माला ( Rohit Sharma) बाद केल्यानंतर टीम इंडियाचा डाव झटपट गुंडाळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला रिषभ पंतनं ( Rishabh Pant) तडाखा दिला. रिषभनं कसोटी कारकिर्दीतील तिसरं शतक साजरं केलं.

जो रूटला खणखणीत षटकार खेचून पंतनं कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केलं. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या.

विराट कोहलीनंही ड्रेसिंग रुममधून धाव घेत पेव्हेलियनमध्ये येत रिषभचे कौतुक केले. घरच्या मैदानावर यापूर्वी तीनवेळा शतकाच्या उंबरठ्यावरून रिषभला माघारी फिरावे लागले होते, परंतु आज त्यानं तो ओलांडला.

रिषभच्या तडफदार फलंदाजीनं नेटिझन्स आणि क्रिकेट चाहते देखील खूष झाले आहेत. अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाजांना तग धरण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असल्याचं दिसत असताना रिषभनं जोरदार फटकेबाजी करुन चाहत्यांचं लक्ष वेधलं.

ट्विटरवर तर चाहत्यांनी रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० सारखा आनंद देतोय असं म्हणत त्याच्या फलंदाजीचं कौतुक करण्यास सुरुवात केलीय.

रिषभनं आपल्या खेळीत रिव्हर्स स्विप आणि फ्रंट फूटवर येऊन खेळून टी-२० क्रिकेटमधले फटके दाखवून इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं.

रिषभनं आपलं शतक देखील षटकार ठोकूनच साजरं केलं. जो रूटच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार ठोकून रिषभनं संघाला आघाडी मिळवून दिलं.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा रिषभ पंत सहावा यष्टिरक्षक ठरला. आतापर्यंत आशियातील दोन यष्टिरक्षकांना इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावता आले आहे.