India vs England, 2nd Test : कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

इंग्लंडविरुद्धच्या ( India vs England, 2nd Test ) कसोटी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया बरोबरी मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं निवडलेल्या अंतिम ११ खेळाडूंच्या निर्णयाचे समर्थन केलं. फिरकीपटू कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) न खेळवल्यामुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर टीका झाली होती. पण, आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटीच्या तयारीला लागली आहे.

निराशाजन कामगिरीनंतरही टीम इंडिया रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला संघात कायम ठेवणार आहे. तो आणि शुबमन गिल ( Shubman Gill) उद्याच्या सामन्यात संघाच्या डावाची सुरुवात करेल. रोहितनं २०१९-२०मध्ये कसोटीत सलामीला खेळताना दोन शतक आणि एक द्विशतक झळकावलं होतं. गिलनं चेन्नई कसोटीत २९ व ५० धावा केल्या होत्या.

मधल्या फळीतही बदल पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील.

फिरकी विभागात आर अश्विन याचे स्थान पक्के आहे, त्याच्या मदतीला वॉशिंग्टन सुंदर असणार आहे. सुंदरनं पहिल्या कसोटीत नाबाद ८५ धावांची खेळी केली होती. अश्विननं दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.

तिसऱ्या फिरकीपटूसाठी अक्षर पटेल ( Axar Patel) आणि कुलदीप यांच्यात शर्यत आहे. पहिल्या कसोटीत शाहबाज नदीमला संधी मिळाली होती, परंतु तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

अक्षर पटेल २०१४पासून कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे आणि त्याला दुसऱ्या कसोटीत संधी मिळणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे अक्षर पहिल्या कसोटीला मुकला होता.

जलदगती गोलंदाजांच्या ताफ्यात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंनाचा प्राधान्य मिळेल. मोहम्मद सिराज पुन्हा एकदा बाकावर बसलेला दिसेल.

टीम इंडियाचा संभाव्य संघ ( Team India's likely playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

दरम्यान इंग्लंडचा संघ जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या दोन अनुभवी गोलंदाजांसह दुसऱ्या कसोटीत मैदानावर उतरणार असल्याचे कर्णधार जो रूटनं स्पष्ट केलं.