IPL 2021: मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका

भारतातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आयपीएलच्या आयोजनावरुन भारतावर आता जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. (India sole focus should be on the raging pandemic Piers Morgan calls for scrapping of IPL 2021)

ब्रिटनचे सुप्रसिद्ध टेलिव्हिजन पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी आयपीएलच्या आयोजनावरुन भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीची भयानक परिस्थिती लक्षात घेता आयपीएल स्पर्धा तात्काळ रद्द करुन देशात कोरोना रोखण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं, असं मत मॉर्गन यांनी व्यक्त केलं आहे.

भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु असून ९ एप्रिल रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ३० मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने सध्या अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई आणि मुंबईत होत आहेत.

भारतात सध्या दिवसाला ३ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. याशिवाय मृत्यूचं प्रमाणंही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाची एवढी मोठी लाट आली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत, असं रोखठोक मत मॉर्गन यांनी व्यक्त केलं आहे. मॉर्गन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे बेजबाबदारपणाचं असल्याची घणाघाती टीका केली आहे.

भारताचं सध्या पूर्णपणे लक्ष हे आयपीएलपेक्षा कोरोना व्हायरस रोखण्याकडे असायला हवं, असं मॉर्गन म्हणाले.

"आयपीएल रद्द करण्याचा निर्णय भारतानं घ्यायला हवा. कारण देशात कोरोना महामारीची भीषण परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. महामारीच्या काळात देशाचं संपूर्ण लक्ष हे विषाणू रोखण्याविरोधात असायला हवं. अशा कठीण काळात क्रिकेट स्पर्धा घेणं हे अर्थहीन आहे", असं मॉर्गन यांनी म्हटलं आहे.

याआधी ऑलम्पिक पदक विजेता अभिवन बिंद्रा यानंही आयपीएलच्या आयोजनावर टीका केली होती. भारतातील सध्याची भीषण परिस्थिती पाहता आयपीएलमुळे या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन देशातील सध्याच्या सर्वात महत्वाच्या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं म्हणत स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना पुढे येण्याचं आवाहन बिंद्रा यानं केलं आहे.

क्रिकेटपटूंनी एवढं तरी जबाबदार असायला हवं की त्यांनी आयपीएलदरम्यान कोरोना बाबत जनजागृती करावी आणि स्वतःचं योगदान द्यावं. सध्यपरिस्थितीत खेळाडूंनी स्वतःच्या आजूबाजूलाही पाहायला हवं. बिंद्रानं इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममधून क्रिकेटपटूंचे कान टोचले होते.

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णवाढीची स्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनीही स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यात अँड्रयू टाय, लायम लिव्हिंगस्टोन, अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन माघारी परतले आहेत.

आता इंग्लंडच्या एका सुप्रसिद्ध टेलिव्हिजन पत्रकारानंच आयपीएलच्या आयोजनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यात आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहणार असल्याचं ठाम मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच व्यक्त केलं आहे.