World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम!

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली.

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे, त्यात कोरोनानं आयपीएलसाठी तयार केलेला बायो बबल भेदल्यानं आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली.

कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी व गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयनं तातडीची बैठक घेऊन स्पर्धा स्थगितीचा निर्णय जाहीर केला.

आयपीएल स्थगितीमुळे टीम इंडियाला आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या फायनलसाठीचा प्लान बदलावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदॅम्प्टन येथे हा अंतिम सामना होणार आहे.

या फायलनसाठी टीम इंडियाचे खेळाडू ३० मे ला आयपीएल फायनल झाल्यानंतर लंडनसाठी रवाना होणार होते, परंतु आता आयपीएल स्थगितीमुळे टीम इंडियाला प्लान बदलावा लागणार आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत आणि मृतांचा आकडाही वाढतोय. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

आयपीएलमध्ये सहभागी झालेले न्यूझीलंडचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायलनसाठी चार्टर्ड प्लेननं एकत्रच लंडनसाठी रवाना होणार होते, परंतु आता प्लान बदलला आहे. आता भारतीय संघ ठरलेल्या वेळेआधीच लंडनसाठी रवाना होणार आहे.

विराट कोहली आणि संघाला लंडनमध्ये अडचणींशिवाय दाखल होता यावं याकरिता बीसीसीआनं लंडन सरकार व इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा सुरू केली आहे. सध्याच्या नियमानुसार आयरीश आणि ब्रिटीश नागरिकांनाही मायदेशात परतल्यानंतर क्वारंटाईन नियमांचे पालन करावे लागत आहे.

सद्यपरिस्थिती पाहता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय पुढील आठवड्यात संघ जाहीर करणार आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारे जम्बो संघ पाठवला, तसाच इंग्लंड दौऱ्यावरही पाठवण्यात येणार आहे.

भारतीय खेळाडूंना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यावर सरावाला परवानगी मिळेल.

Read in English