चेंडूचा वेग 150 kmph; टीम इंडियाच्या पाच वीरांमध्ये आहे ही 'पॉवर'!

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटविश्वात फलंदाजांना बाद करण्यासाठी नकल बॉल, स्लो बाउन्सर यांसारखे पर्याय गोलंदाजांनी शोधून काढले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जर एखाद्या गोलंदाजाने 150 किमी प्रतितास या वेगाने चेंडूचा भेदक मारा केल्यास फलंदाजांना खेळण्यास अवघड होते. सध्यातरी गोलंदाजांना गोलंदाजी करताना 150 किमी प्रतितास वेगाचं सातत्य राखणं अवघड असलं तरी भारताकडे असे पाच गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडे 150 किमी प्रतितासच्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमध्ये त्याच्या अद्वितीय अ‍ॅक्शन आणि यॉकरचा टिच्चून मारा करण्याची क्षमता असल्यामुळे तो लवकरच जगातील सर्वोतकृष्ट गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. ट्वेंटी 20, वन- डेसह कसोटी क्रिकेटमध्येही बुमराहने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. तसेच बुमराहने अनेकवेळा 150 kmphच्या वेगाने गोलंदाजी केली असून या गतीत सातत्या राखण्याची कला देखील बुमराहकडे आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील नियमितपणे 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतो. परंतु चेंडूचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात उमेश यादव अनेकदा चेंडूवरचे नियंत्रण गमवतो. उमेश यादवच्या याच चूकीमुळे त्यांने वन- डे आणि ट्वेंटी- 20 संघातून आपले स्थान गमावले आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये गतीच्या जोरवार उमेशने आजही स्थान टिकवून ठेवले आहे. तसेच आगामी 2020च्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर उमेश यादव पुन्हा वन- डे, ट्वेंटी- 20च्या भारतीय संघात स्थान मिळवणार की नाही याचे उत्तर आयपीएलनंतरच समोर येणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिध्द कृष्णाकडे देखील वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या 2019च्या हंगामात प्रसिध्दने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच चकीत केले होते. त्यामुळे 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता प्रसिध्द कृष्णाकडेही असल्याचे दिसून येते. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका मुलाखतीत आगामी ट्वेंटी- 20 क्रिकेट विश्वचषकात प्रसिध्दला संधी देणार असल्याचे देखील सांगितले होते.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या यादीमध्ये सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. 2019च्या आयपीएलच्या हंगामात इशांतने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतान चांगली कामगिरी केली होती. तसेच इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये 150 किमी प्रतितास वेगाने अनेकदा गोलंदाजी केली आहे. सद्यस्थितीत इशांत शर्मा कसोटी क्रिकेटमधील महत्वाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

मोहम्मद शमीने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले होते तेव्हा त्यांच्या फिटनेसमुळे तो जास्त काळ संघात स्थान टिकवून ठेवणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शमीने फिटनेसवर खूप मेहनत करुन न- डे, ट्वेंटी20 आणि कसोटी क्रिकेट संघातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मोहम्मद शमीकडे देखील सतत वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असल्याचे गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यातून दिसून आले आहे.