भारताच्या स्टार फलंदाजाचं आज शुभमंगल सावधान; अभिनेत्रीवर जडला जीव

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे आज बोहोल्यावर चढणार आहे. त्याच्या लग्नाची घोषणा करण्यात आली असून त्याची भावी पत्नी अभिनेत्री आहे.

30 वर्षीय मनीष दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह करणार आहे. मनीषच्या नेतृत्वाखाली रविवारी कर्नाटक संघानं थरारक सामन्यात तामिळनाडूवर एक धावांनी विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धा जिंकली.

कर्नाटकच्या 5 बाद 180 धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूला 6 बाद 179 धावाच करता आला. या सामन्यात मनीषनं 60 धावांची खेळी केली.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिले शतक ठोकणाऱ्या मनीषचे लग्न आज मुंबईत होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत त्याचा विवाह होणार आहे.

मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत. अश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे.

26 वर्षी अश्रितानं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती आर पन्नीर्सेलवम यांच्या दिग्दर्शीत चित्रपटातही दिसणार आहे.

मनीषच्या लग्नाला केवळ नातेवाईक आणि काही जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहेत. त्याच्या लग्नाला भारतीय संघातील सर्व खेळाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मनीषने भारताकडून 23 वन डे सामन्यांत 1 शतक व 2 अर्धशतकांसह 440 धावा केल्या आहेत. 31 ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 37.66च्या सरासरीनं 565 धावा केल्या आहेत.